मुंबई प्रतिनिधी
मुंबई : अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देत एका वयोवृद्ध व्यावसायिकाला ब्लॅकमेल करून तब्बल ७५ लाख रुपयांची खंडणी वसूल केल्याचा धक्कादायक प्रकार नागपाडा परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन महिलांसह चौघांविरुद्ध नागपाडा पोलिसांनी खंडणीसह अन्य कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
शफीक हनीफ शेख, मुस्कान रफिक शेख, मिनू मुमताज आणि राजेंद्र उत्तेकर अशी गुन्हा दाखल झालेल्या चौघांची नावे आहेत. यातील तक्रारदार हे नवी मुंबईतील खारघर परिसरात राहणारे वयोवृद्ध व्यावसायिक असून, त्यांचा नागपाडा परिसरात एक फ्लॅट आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे सात वर्षांपूर्वी तक्रारदारांची खारघर येथे राहणाऱ्या शफीक शेख आणि मुस्कान शेख यांच्याशी ओळख झाली होती. त्यानंतर या दोघांच्या माध्यमातून मिनू मुमताज आणि राजेंद्र उत्तेकर यांच्याशीही त्यांची ओळख झाली. या ओळखीचा गैरफायदा घेत आरोपींनी संगनमत करून तक्रारदार आणि मिनू यांच्यात जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
त्यानंतर तक्रारदार आणि मिनू यांचे अश्लील व्हिडीओ तयार करण्यात आले. हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देत आरोपींनी तक्रारदारांना पैशांसाठी ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. बदनामीच्या भीतीपोटी तक्रारदारांनी आरोपींना वेळोवेळी ७५ लाख रुपये दिले. मात्र, एवढी मोठी रक्कम दिल्यानंतरही आरोपींची पैशांची मागणी सुरूच राहिली.
अखेर सततच्या धमक्या आणि पैशांच्या मागणीला कंटाळून तक्रारदारांनी नागपाडा पोलिसांकडे धाव घेतली. त्यांच्या तक्रारीनुसार चौघांविरुद्ध खंडणीसह संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शफीक आणि मुस्कान हे दोघे खारघर परिसरात, तर राजेंद्र उत्तेकर हा मुलुंड परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा अधिक तपास नागपाडा पोलीस करीत आहेत.

