मुंबई प्रतिनिधी
गुजरातहून मुंबईत होणाऱ्या आंतरराज्य अंमली पदार्थ तस्करीचा सूरत गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेवर कारवाई करत पोलिसांनी सुमारे ३० लाख रुपये किमतीचे ९७७ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) जप्त केले. या प्रकरणात मलेशियन एअरलाइन्सची माजी कॅबिन क्रू मेंबर मानसी सईद (४१) आणि तिचा साथीदार सोहेल सुलेमान शेख (२०) या दोघांना अटक करण्यात आली आहे. दोघेही मुंबईतील सांताक्रूझ परिसरातील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सूरत गुन्हे शाखेला बडोद्याहून भाड्याच्या कारमधून मोठ्या प्रमाणावर एमडी मुंबईत आणली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सोमवारी दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेवरील कामरेज टोल पोस्टजवळ सापळा रचण्यात आला. संशयित पांढऱ्या रंगाची कार टोलनाक्यावर येताच पोलिसांनी ती अडवून तपासणी केली. कारमध्ये मानसी सईद आणि सोहेल शेख आढळून आले. झडतीदरम्यान ९७७ ग्रॅम एमडीसह अंमली पदार्थांचे छोटे पॅकेट तयार करण्यासाठी प्लास्टिकच्या पिशव्या, कंटेनर आणि अनेक मोबाईल जप्त करण्यात आले.
मुंबईत ५ ते १० ग्रॅमची पाकिटे करून विक्रीचा डाव
चौकशीत या अंमली पदार्थाची मुंबईत नेऊन ५ ते १० ग्रॅमची छोटी पाकिटे तयार करून ग्राहकांच्या मागणीनुसार विविध भागांत विक्री करण्याचा आरोपींचा डाव असल्याचे समोर आले आहे. यासाठी आरोपींनी कारही मुंबईतून भाड्याने घेतली होती.
पोलिसांच्या माहितीनुसार, दोघेही एमडीचा साठा घेण्यासाठी बडोद्याला गेले होते. बडोदा रेल्वे स्थानकाजवळ एका अनोळखी महिलेने त्यांच्याकडे हा साठा सुपूर्द केला. त्यानंतर दोघे एक्स्प्रेसवेने मुंबईच्या दिशेने निघाले असता सूरत गुन्हे शाखेने त्यांना जेरबंद केले.
डायपरचा वापर करून पोलिसांची दिशाभूल?
आरोपींनी अंमली पदार्थ लपवण्यासाठी आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी लहान मुलांच्या डायपरचा वापर केल्याचा संशय तपासातून व्यक्त करण्यात आला आहे. हायवेवर कौटुंबिक प्रवास सुरू असल्याचा आभास निर्माण करण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
२०१५ पासून नेटवर्कच्या संपर्कात असल्याचा तपास
मुख्य आरोपी मानसी सईद ही २०१५ पासून अंमली पदार्थांच्या नेटवर्कच्या संपर्कात असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. सुरुवातीला ती स्वतः एमडीचे सेवन करत होती, मात्र नंतर तस्करीच्या व्यवहारात सहभागी झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तिच्याविरुद्ध यापूर्वीही अंमली पदार्थांशी संबंधित गुन्हे दाखल आहेत. २०२१ मध्ये इंदूर गुन्हे शाखेने तिला १०० ग्रॅम मेफेड्रोनसह अटक केली होती. त्यानंतर कारावासातून बाहेर आल्यानंतर तिने पुन्हा मुंबईत अंमली पदार्थांचा व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न केल्याचा पोलिसांचा दावा आहे.
या प्रकरणात अंमली पदार्थ पुरवणारी अनोळखी महिला कोण, तसेच मुंबईतील ग्राहक आणि तस्करीच्या जाळ्यातील इतर सदस्य कोण आहेत, याचा सूरत गुन्हे शाखेकडून अधिक तपास सुरू आहे.

