नागपूर प्रतिनिधी
भारतीय संविधान आणि लोकशाहीची सर्वांत मोठी ताकद म्हणजे ती सामान्य व्यक्तीलाही सर्वोच्च पदापर्यंत पोहोचण्याची संधी देते. मनात ठाम ध्येय असेल आणि ते साध्य करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले, तर कोणतीही व्यक्ती आयुष्यात मोठे यश मिळवू शकते, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. तरुणांना मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान होण्याची इच्छा असणे ही महत्त्वाकांक्षा सकारात्मक असून, त्यातून भारतीय लोकशाहीची ताकद अधोरेखित होते, असेही त्यांनी सांगितले.
नागपुरातील रेशीमबाग मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या ‘मंथन फॉर युवा’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी जेन-झी पिढीतील हजारो तरुण-तरुणींशी संवाद साधला. या वेळी त्यांनी आपल्या राजकीय प्रवासातील संघर्ष, राजकारणात येण्यामागील भूमिका, यशानंतर वाढणाऱ्या जबाबदाऱ्या आणि त्यातून निर्माण होणारा मानसिक दबाव याबाबत मनमोकळेपणाने भाष्य केले. तरुणांनी मोठी स्वप्ने पाहावीत; मात्र त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी संघर्ष करण्याची आणि सातत्याने मेहनत घेण्याची तयारीही ठेवावी, असा संदेश त्यांनी दिला.
फडणवीस म्हणाले की, राजकीय प्रवास सुरू करताना आपण मुख्यमंत्री होऊ, असा विचार मनात कधीच केला नव्हता. राजकारणात प्रवेश केला तेव्हा सत्तेची अपेक्षा नव्हती. विरोधी पक्षात राहून आंदोलन करणे, संघर्ष करणे आणि सामाजिक प्रश्नांसाठी आवाज उठवणे, या उद्देशानेच आपण राजकारणात आलो. मात्र काळाच्या ओघात नगरसेवकापासून मुख्यमंत्रीपदापर्यंतचा प्रवास घडला. हा प्रवास केवळ वैयक्तिक यशाचा नसून भारतीय संविधान आणि लोकशाहीने दिलेल्या संधीचे उदाहरण आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
संघर्षातूनच मानसिक ताकद निर्माण होते
राजकारण हे आपल्यासाठी व्यवसाय नसून सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन घडवून आणण्याचे प्रभावी माध्यम असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. विद्यार्थी जीवनापासूनच सामाजिक आणि राजकीय आंदोलनांमध्ये सहभागी झाल्याचे सांगताना त्यांनी अटक, पोलिसांचा सामना आणि तुरुंगवासाचे प्रसंगही आठवले. त्या काळातील संघर्षामुळे कठीण परिस्थितीला सामोरे जाण्याची मानसिक तयारी झाली. त्यामुळे पुढे मोठ्या पदावर आल्यानंतर निर्माण होणाऱ्या दबावाचा सामना करण्याची ताकदही संघर्षातूनच मिळाली, असे त्यांनी नमूद केले.
मोठ्या पदावर पोहोचल्यानंतर अधिकार वाढतात, त्याचबरोबर जबाबदाऱ्याही मोठ्या प्रमाणात वाढतात. त्यामुळे मानसिक दबाव निर्माण होणे स्वाभाविक आहे. मात्र, दबावाला घाबरून न जाता त्याचा सामना करण्याची मानसिकता विकसित करणे आवश्यक आहे. संघर्षाच्या काळातच ही मानसिकता तयार होते, असे फडणवीस यांनी तरुणांना सांगितले.
दीड लाख तरुणांचा सहभाग
‘मंथन फॉर युवा’च्या माध्यमातून गेल्या काही दिवसांत सुमारे दीड लाख तरुणांनी विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेतल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. रेशीमबाग मैदानावरही २० ते २५ हजार तरुण-तरुणी उपस्थित असल्याचे त्यांनी नमूद केले. तरुणांच्या विविध क्षेत्रातील स्वप्नांना दिशा देणे आणि त्यांना संधी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमात तब्बल ४ हजार १०० मुला-मुलींनी एकत्रित ढोल-ताशा वादन करून विक्रम नोंदवला. तरुणाईच्या ऊर्जा, उत्साह आणि सामूहिक सहभागाचे हे प्रभावी दर्शन असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.
राहुल गांधींवर फडणवीसांचा निशाणा
दरम्यान, पुण्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रो की गुंज’ कार्यक्रमाला महिला आणि विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. राहुल गांधी पुण्यात महिला अधिकारांबाबत बोलतात; मात्र त्यांची प्रत्यक्ष भूमिका वेगळी असल्याचा आरोप त्यांनी केला.
‘राहुल गांधी यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत,’ अशा शब्दांत फडणवीस यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. महिला अधिकारांबाबत बोलणाऱ्या राहुल गांधी यांनी महिला आरक्षणाला विरोध केला होता, असा दावा करत काँग्रेसवरही त्यांनी निशाणा साधला. काँग्रेस हा दिशाहीन पक्ष असून त्याचे नेते केवळ ‘बोल बच्चन’ करतात. पक्षाची जमिनीपासून नाळ तुटली असल्याची टीकाही फडणवीस यांनी केली.
राहुल गांधी यांच्या पुण्यातील कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आदिवासी विद्यार्थी नेत्यांच्या राजकीय पार्श्वभूमीचा विचार करण्याची गरज असल्याचेही फडणवीस यांनी म्हटले. महाराष्ट्र सरकार आदिवासी विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणात योजना राबवत असून, इतर कोणत्याही राज्यापेक्षा महाराष्ट्रात आदिवासी विद्यार्थ्यांना अधिक योजनांचा लाभ दिला जात असल्याचा दावा त्यांनी केला.
वसतिगृहापासून वंचित विद्यार्थ्यांना आर्थिक मदत
वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या सुमारे २० हजार विद्यार्थ्यांना प्रत्येकी ६० हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जात असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. तरुणांच्या शिक्षणातील अडथळे दूर करण्याबरोबरच त्यांना रोजगार, कौशल्य, नेतृत्व आणि सामाजिक क्षेत्रात पुढे जाण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तरुणाई ही देशाची सर्वांत मोठी शक्ती असून तिच्या आकांक्षांना योग्य दिशा मिळणे आवश्यक आहे. मोठे ध्येय बाळगणे, अपयशाला न घाबरणे, संघर्षातून शिकणे आणि सातत्याने प्रयत्न करत राहणे, या चार गोष्टी यशासाठी महत्त्वाच्या आहेत, असा संदेश ‘मंथन फॉर युवा’च्या माध्यमातून मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला.
नगरसेवकापासून मुख्यमंत्रीपदापर्यंतचा स्वतःचा प्रवास सांगताना फडणवीस यांनी लोकशाही व्यवस्थेवरील विश्वास अधोरेखित केला. त्यामुळे तरुणांनी आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवून मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

