नागपूर प्रतिनिधी
नागपूर जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध विकासकामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही. प्रत्येक काम हे जनतेच्या पैशातून आणि जनहितासाठी होत असल्याने त्याचा दर्जा उत्तम असलाच पाहिजे. तसेच निर्धारित वेळेत काम पूर्ण करण्याचे बंधन संबंधित यंत्रणेने पाळावे, अशा स्पष्ट आणि सक्त सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्या.
नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांची पाहणी करून त्यांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी संबंधित अधिकारी आणि अभियंत्यांकडून कामांची सद्यःस्थिती, प्रगती, अडचणी तसेच भविष्यातील नियोजनाची माहिती घेतली.
सारथीच्या अत्याधुनिक इमारतीची पाहणी
मंत्री भोसले यांनी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या (सारथी) मुलांचे व मुलींचे वसतिगृह, विभागीय कार्यालय तसेच ग्रंथालय इमारतीच्या बांधकामाची पाहणी केली. विदर्भातील शासकीय संस्थेसाठी प्रथमच G+16 स्वरूपातील उंच इमारतीच्या माध्यमातून आधुनिक पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत.
या प्रकल्पामध्ये सुमारे ५०८ विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात येणार असून, आधुनिक ग्रंथालय, ई-लायब्ररी, प्रशिक्षण केंद्र आणि प्रशासकीय सुविधांचाही समावेश आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक वातावरण आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने या प्रकल्पाचे महत्त्व लक्षात घेऊन कामाची गुणवत्ता आणि सुरक्षिततेच्या निकषांकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना भोसले यांनी केल्या.
नागपूर स्पोर्ट्स हबच्या कामाचाही आढावा
शिवेंद्रसिंहराजे यांनी नागपूर स्पोर्ट्स हब प्रकल्पाचीही पाहणी केली. प्रकल्पाचे आतापर्यंत झालेले काम, प्रस्तावित क्रीडा सुविधा आणि आगामी टप्प्यातील नियोजन याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. नागपूरमध्ये क्रीडा क्षेत्रासाठी उभारल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधांचा उपयोग खेळाडूंना मोठ्या प्रमाणात व्हावा, यासाठी प्रकल्पाची कामे नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला.
रस्ते, पूल आणि खड्ड्यांच्या कामांवर लक्ष
सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, नागपूरअंतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांचाही यावेळी सविस्तर आढावा घेण्यात आला. विभागातील रिक्त पदांची सद्यःस्थिती, जिल्हानिहाय रस्ते आणि पुलांची माहिती, वृक्षलागवड टप्पा-२, शासकीय इमारतींचे परिरक्षण व दुरुस्ती, जनसुविधा केंद्रांसाठी प्रस्तावित जागा याबाबत मंत्र्यांनी माहिती घेतली.
नाबार्ड-३१ अंतर्गत सुरू असलेल्या कामांची प्रगती, हायब्रिड अॅन्युइटी योजनेंतर्गत सुरू असलेली कामे आणि रस्त्यांवरील खड्डे भरण्याच्या कामाचाही त्यांनी आढावा घेतला. पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता दुरुस्तीची कामे केवळ तात्पुरत्या स्वरूपाची न करता आवश्यक त्या गुणवत्तेच्या निकषांनुसार करण्याचे निर्देश देण्यात आले.
‘अमृतकाल रस्ते विकास योजने’चा आराखडाही तपासला
‘अमृतकाल रस्ते विकास योजना’ या महत्त्वाच्या आराखड्याचाही मंत्र्यांनी आढावा घेतला. नागपूर विभागातील रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांचा विकास करताना भविष्यातील वाहतूक गरजा लक्षात घेऊन नियोजन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. विकासकामे मंजूर करून घेणे एवढ्यावरच न थांबता त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी, गुणवत्ता आणि वेळेचे काटेकोर पालन याकडे विभागाने लक्ष द्यावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
अधिकाऱ्यांना कामाचा वेग वाढविण्याचे निर्देश
विकासकामांमध्ये विलंब झाल्यास त्याचा थेट परिणाम नागरिकांवर होत असतो. त्यामुळे प्रलंबित कामांचा आढावा घेऊन अडथळे तातडीने दूर करावेत आणि कामांना गती द्यावी, असेही भोसले यांनी सांगितले. नागपूर विभागातील पायाभूत सुविधांची कामे अधिक गतिमान, पारदर्शक आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यावर भर देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता संभाजी माने, सार्वजनिक बांधकाम मंडळ, नागपूरच्या अधीक्षक अभियंता निता ठाकरे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
जनतेच्या पैशातून होणाऱ्या प्रत्येक विकासकामाचा दर्जा हा सर्वोच्च असला पाहिजे आणि कामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाऊ नये, हा संदेश या पाहणी दौऱ्यातून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आला.

