रणजित मस्के, गुन्हे वार्ताहर
अहिल्यानगर : एमआयडीसी परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. आरोपींकडून दोन गावठी कट्टे, चार जिवंत काडतुसे, लोखंडी टॉमी, मिरची पूड, सहा मोबाईल आणि दोन आलिशान कार असा एकूण ३२ लाख १९ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील दोन आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध यापूर्वी दरोडा, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील दरोडे आणि जबरी चोरीच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला दरोडा प्रतिबंधक गस्त वाढविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे आणि पोलीस अंमलदार विजय ठोंबरे, विजय पवार, सुनील पवार, बिरप्पा करमल, राहुल डोके, आजिनाथ पाखरे, प्रशांत राठोड, रमीजराजा आत्तार, भगवान धुळे आणि सोनल भागवत यांचे पथक गस्तीसाठी रवाना करण्यात आले होते.
शुक्रवारी, २१ ऑगस्ट रोजी हे पथक एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना गोपनीय बातमीदाराकडून महत्त्वाची माहिती मिळाली. एमआयडीसी ते शेंडी बायपास मार्गावरील गुरुदत्त मित्रमंडळ, लवणवाडी परिसरातील पाटीजवळ पाच जण दोन काळ्या रंगांच्या चारचाकी वाहनांसह दरोडा टाकण्याच्या तयारीत थांबले असल्याचे या माहितीत सांगण्यात आले होते.
त्यानंतर पोलिसांनी संबंधित ठिकाणी जाऊन पाहणी केली असता दोन काळ्या रंगांच्या वाहनांजवळ पाच जण संशयास्पदरीत्या उभे असल्याचे आढळून आले. चौकशीदरम्यान समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने पोलिसांनी शाहरुख रज्जाक शेख (वय ३४, निमगाव खैरी, ता. श्रीरामपूर), इम्रान अन्वर पठाण (वय २३, टाकळी, ता. कोपरगाव), तंजीम नदीम शेख (वय २६, मिलननगर, नांदगाव रोड, येवला), फिरोज चाँद शेख (वय ३५, ताजपार्क, दत्तमंदिराजवळ, येवला) आणि रेहान रौफ शेख (वय ३०, वॉर्ड क्रमांक २, श्रीरामपूर) यांना ताब्यात घेतले.
त्यांच्या ताब्यातून दोन गावठी कट्टे, चार जिवंत काडतुसे, लोखंडी टॉमी, मिरची पूड, सहा मोबाईल तसेच विनाक्रमांकाची काळ्या रंगाची ह्युंदाई क्रेटा आणि काळ्या रंगाची टाटा हॅरियर कार जप्त करण्यात आली. या सर्व मुद्देमालाची किंमत ३२ लाख १९ हजार १०० रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले.
दरम्यान, आरोपी शाहरुख शेख आणि इम्रान पठाण यांची अधिक चौकशी केली असता, जप्त केलेले गावठी कट्टे आणि काडतुसे हे आसिफ ऊर्फ आश्यू पठाण आणि राजेंद्र भाऊसाहेब गांगुर्डे यांच्याकडून खरेदी केल्याची माहिती मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले. हे दोघेही सध्या फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, शाहरुख शेख याच्याविरुद्ध यापूर्वी श्रीरामपूर, नारायणगाव, लोणी, नगर तालुका, शिर्डी, कॅम्प आणि कोपरगाव परिसरातील पोलीस ठाण्यांमध्ये दरोडा, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत विविध गुन्हे दाखल आहेत. इम्रान पठाण याच्याविरुद्धही कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा आणि इतर गंभीर कलमांन्वये गुन्हे दाखल आहेत.
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ३१०(४), ३१०(५) तसेच शस्त्रास्त्र कायद्यातील कलम ३/२५ आणि ७/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस ठाणे करीत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आणि अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे तसेच त्यांच्या पथकाने केली.

