हैदराबाद/नलगोंडा:
शाळेची फी लुटण्यासाठी मुख्याध्यापिकेच्या घरात घुसलेल्या दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांनी त्यांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना तेलंगणातील नलगोंडा जिल्ह्यात उघडकीस आली आहे. मुख्याध्यापिका रुपा रेड्डी यांच्यावर चाकूने तब्बल २७ वार करण्यात आले. या हत्येच्या तपासात केवळ एका शब्दाने पोलिसांना आरोपींपर्यंत पोहोचवले. तो शब्द होता, ‘बाबू’. रुपा रेड्डी यांनी हल्लेखोराला ‘बाबू’ म्हणून हाक मारल्याचे फोनवरील संभाषणात रेकॉर्ड झाले होते. याच धाग्याच्या आधारे पोलिसांनी तपासाची दिशा बदलली आणि अखेर दहावीतील दोन विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले.
शाळेची फी लुटण्याचा कट
पोलिसांच्या तपासानुसार, ११ ऑगस्ट रोजी शाळेची मोठी फी जमा झाल्याची माहिती दोन्ही विद्यार्थ्यांना मिळाली होती. ही रक्कम मुख्याध्यापिका रुपा रेड्डी यांच्या घरी ठेवली असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. त्यानंतर दोघांनी ही रक्कम लुटण्याचा कट रचला.
यासाठी दोघांनी मास्क आणि हुडी परिधान केली. त्यापैकी एक विद्यार्थी रुपा रेड्डी यांच्या घरात शिरला, तर दुसरा घराबाहेर उभा राहून पहारा देत होता.
मास्क खाली पडला अन् मुख्याध्यापिकेने ओळखले
घरात प्रवेश केल्यानंतर आरोपी विद्यार्थ्याचा मास्क अचानक चेहऱ्यावरून खाली पडला. त्यावेळी रुपा रेड्डी फोनवरून त्यांच्या मावशीशी बोलत होत्या. समोरचा मुलगा आपल्या शाळेतील विद्यार्थी असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
रुपा रेड्डी यांनी त्याला ‘बाबू’ अशी हाक मारली. विशेष म्हणजे, त्यावेळी सुरू असलेल्या फोन कॉलमध्ये हा शब्द रेकॉर्ड झाला. मुख्याध्यापिकेने आपल्याला ओळखल्याची भीती आरोपीला वाटली. त्यानंतर त्याने चाकूने त्यांच्यावर हल्ला केला.
२७ वार; जागीच मृत्यू
नलगोंडाचे एसपी शरत चंद्र पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने रुपा रेड्डी यांच्यावर चाकूने तब्बल २७ वेळा वार केले. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
हत्या केल्यानंतर आरोपीने घरातून सुमारे २ लाख २० हजार रुपये घेतले आणि तेथून पसार झाला. बाहेर पहारा देत असलेल्या साथीदाराला त्याने त्यातील ४० हजार रुपये दिले.
मात्र, पोलिसांसमोर सर्वात मोठा प्रश्न होता तो म्हणजे, ‘बाबू’ नेमका कोण?
‘बाबू’चा शोध घेताना पोलिसांची नजर विद्यार्थ्यांकडे
रुपा रेड्डी कोणाला ‘बाबू’ म्हणून संबोधत होत्या, याचा शोध पोलिसांनी सुरू केला. तपास करताना पोलिसांनी शाळेतील विद्यार्थ्यांचीही चौकशी केली. सुरुवातीला दहावीतील पाच विद्यार्थ्यांवर पोलिसांना संशय आला.
मात्र, तपास पुढे सरकत असताना त्यापैकी दोन विद्यार्थ्यांचे वर्तन संशयास्पद असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. हत्येच्या घटनेनंतरच्या दोन-तीन दिवसांत या दोघांनी मोठ्या प्रमाणात पैसे खर्च केल्याचेही समोर आले. त्यामुळे पोलिसांनी त्यांची कसून चौकशी सुरू केली.
रक्ताचे डाग असलेल्या नोटांनी दिला महत्त्वाचा पुरावा
चौकशीदरम्यान पोलिसांना एका विद्यार्थ्याकडून तब्बल १ लाख ५४ हजार रुपये मिळाले. या पैशांबाबत विचारणा केली असता सुरुवातीला त्याने हे पैसे आई-वडिलांनी दिल्याचा दावा केला.
मात्र, पोलिसांना काही नोटांवर रक्ताचे डाग आढळले. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला. रक्ताने माखलेल्या नोटांसह इतर पुरावे विद्यार्थ्यांसमोर ठेवण्यात आले. त्यानंतर दोन्ही विद्यार्थ्यांनी चोरी आणि हत्येची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
चाकू, मास्क, ग्लोव्हजसह तीन मोबाइल जप्त
पोलिसांनी आरोपींकडून सुमारे १.५४ लाख रुपये रोख, तीन मोबाइल फोन, हत्येसाठी वापरलेला चाकू, ग्लोव्हज आणि मास्क जप्त केला आहे. यातील एका विद्यार्थ्याने हत्येच्या सुमारे २० दिवस आधी आयफोन खरेदी केल्याचेही तपासात समोर आले आहे. या मोबाइलच्या खरेदीचा चोरीच्या पैशांशी काही संबंध आहे का, याचाही तपास सुरू आहे.
पार्टी, महागड्या वस्तू आणि सोशल मीडियावरून ‘झटपट पैसा’ कमावण्याचा हव्यास?
दोन्ही विद्यार्थ्यांनी यापूर्वीही छोट्या-मोठ्या चोऱ्या केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. पार्टी आणि मौजमजेसाठी पैसे खर्च करण्याची त्यांना सवय असल्याचेही तपासात आढळले. तसेच सोशल मीडिया आणि यूट्यूबवरून कमी वेळेत मोठ्या प्रमाणात पैसे कमावण्याच्या पद्धतींचा ते शोध घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
बाईक खरेदी करण्याची इच्छा आणि वाढता खर्च यामुळे शाळेची फी लुटण्याचा कट रचला गेला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे. मात्र, या हत्येमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास अद्याप सुरू आहे.
CCTV आणि फॉरेन्सिक पुरावे तपासणीखाली
या प्रकरणात पोलिसांनी परिसरातील CCTV फुटेज, फॉरेन्सिक पुरावे तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे तपास केला आहे. घटनास्थळावरील पुरावे आणि आरोपींकडून जप्त केलेल्या वस्तूंचीही तपासणी करण्यात येत आहे.
दोन्ही आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांच्यावर किशोर न्याय कायद्यानुसार कारवाई करण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणात ‘बाबू’ या एका शब्दापासून सुरू झालेला तपास अखेर मुख्याध्यापिकेच्याच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला. मात्र, पैशांच्या हव्यासातून अल्पवयीन विद्यार्थ्यांनी इतक्या क्रूरपणे हत्या का केली आणि या कटामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

