रणजित मस्के, गुन्हे वार्ताहर
सांगली : जिल्ह्यात अंमली पदार्थांची तस्करी आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) धडक कारवाई केली आहे. मिरज-पंढरपूर महामार्गावर सापळा रचून पोलिसांनी तब्बल ३०० किलो गांजा, कंटेनर आणि मोबाईल असा एकूण १ कोटी ७५ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी मंगेश प्रकाश मोरे (वय ४६, रा. बोरजाईवाडी, ता. कोरेगाव, जि. सातारा) यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, ओडिशा राज्यातून पुण्यात हा गांजा विक्रीसाठी नेण्यात येत असल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे.
सांगली जिल्ह्यात अंमली पदार्थांचे जाळे उद्ध्वस्त करण्याचे कडक आदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिले होते. याच पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस पथक गस्तीवर असताना, मिरज-पंढरपूर महामार्गावरील तानंग फाटा ते मालगाव जाणाऱ्या रस्त्यावर एक संशयास्पद कंटेनर (क्रमांक NL-01-AD-9366) थांबवण्यात आला. पंचांसमक्ष या वाहनाची झडती घेतली असता, त्यात १५० खाकी रंगाची पाकिटे आढळून आली. या प्रत्येक पाकिटात अंदाजे दोन किलो वजनाचा हिरवट-काळपट रंगाचा तयार गांजा असल्याचा संशय बळावला. पोलिसांनी खात्री केल्यानंतर हा तब्बल ३०० किलो गांजा असल्याचे निष्पन्न झाले.
चौकशीदरम्यान संशयित आरोपी मंगेश मोरे याने हा गांजा ओडिशा राज्यातील बालेगोडा ते तुंबडी परिसरातील एका शेतातून भरला असून, तो पुणे जिल्ह्यात विक्रीसाठी घेऊन जात असल्याची कबुली दिली. पोलिसांनी १ कोटी ५० लाख रुपये किमतीचा ३०० किलो गांजा, २५ लाख रुपयांचे अशोक लेलँड कंटेनर आणि १० हजार रुपयांचे दोन मोबाईल असा एकूण १ कोटी ७५ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक करत आहेत.
पोलीस दलाची यशस्वी कामगिरी:
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि सायबर पोलीस ठाण्याच्या पथकातील अंमलदारांनी संयुक्तपणे पार पाडली.

