मुंबई प्रतिनिधी
मुंबई : अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर वरिष्ठ आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्यभरातील बेकायदा, अस्वच्छ आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरोधात कारवाईचा धडाका सुरू केला आहे. मुंबईतील नामांकित हॉटेल्स आणि आयआयटी बॉम्बेतील कँटीनपासून ते बीडमधील खाद्यतेलाच्या बेकायदा रिपॅकिंग युनिट्सपर्यंत एफडीएकडून कारवाई करण्यात आली आहे.
मुंबईतील चार हॉटेल्समध्ये तपासणीदरम्यान अस्वच्छता, झुरळे आणि घरमाशांचा वावर तसेच गंजलेल्या भांड्यांचा वापर आढळून आल्याने संबंधित हॉटेल्सचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. यामध्ये दादर येथील Eat Nino, अंधेरीतील जय माँ काली ढाबा, सांताक्रूझमधील हाऊस ऑफ महाराष्ट्र आणि कुर्ल्यातील साऊथ इंडियन डोसा कॉर्नर यांचा समावेश आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने गंभीर बाबी आढळून आल्यानंतर एफडीएच्या पथकाने आयआयटी बॉम्बे कॅम्पसमधील दोन कँटीनवरही कारवाई केली. या दोन्ही कँटीनचे कामकाज तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गुटखा, भेसळयुक्त अन्नपदार्थ, बेकायदा औषधे तसेच हॉटेल आणि खाद्य आस्थापनांमधील नियमबाह्य प्रकारांविरोधात कारवाईला वेग आला आहे.
याचदरम्यान, बीड जिल्ह्यात खाद्यतेलाचे बेकायदा रिपॅकिंग आणि साठवणूक करणाऱ्या पाच ठिकाणी एफडीएने छापे टाकले. रिफाइंड आणि अल्ट्रा रिफाइंड अशा आकर्षक नावांनी पॅकिंग बदलून कमी दर्जाचे तेल विक्रीसाठी पाठवले जात असल्याचे कारवाईत समोर आले. या कारवाईत तब्बल १ लाख १९ हजार १८६ किलो खाद्यतेल आणि इतर साहित्य असा एकूण १ कोटी ९४ लाख ५० हजार ९२२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
बीडमधील स्वागत ऑइल इंडस्ट्रीज, चरखा ऑइल मिल, वडवणीतील जय हनुमान ट्रेडर्स, माजलगावमधील जानवी कमर्शियल आणि विनायक ऑइल मिल या पाच युनिट्सवर कारवाई करण्यात आली. संबंधित युनिट्सचे परवाने निलंबित करून ती सील करण्यात आली आहेत. अन्नपदार्थांच्या गुणवत्तेशी तडजोड करणाऱ्या तसेच अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरोधात एफडीएकडून सुरू असलेल्या या कारवाईमुळे संबंधित व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

