मुंबई प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांच्या जुलै महिन्याच्या वेतनाला यंदाही विलंब झाला आहे. दर महिन्याला ७ तारखेला वेतन मिळण्याची अपेक्षा असताना आता १० ऑगस्टपर्यंत पगाराची प्रतीक्षा करण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर आली आहे. सोमवारी, १० ऑगस्ट रोजी वेतन मिळण्याची शक्यता असली तरी तीन दिवसांच्या विलंबामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन मोठ्या प्रमाणात राज्य सरकारकडून मिळणाऱ्या सवलत मूल्य प्रतिपूर्तीच्या निधीवर अवलंबून आहे. राज्य सरकारच्या विविध योजनांअंतर्गत प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सवलतींची रक्कम सरकारकडून एसटी महामंडळाला प्रतिपूर्तीच्या स्वरूपात दिली जाते. या निधीसाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून २९ विविध सवलत योजनांची माहिती, सनदी लेखापालांकडून करण्यात आलेले अंकेक्षण तसेच आवश्यक कागदपत्रे सरकारकडे सादर करण्यात आल्याचा दावा कर्मचारी संघटनेकडून करण्यात आला आहे.
मात्र, निधी मंजूर करण्याऐवजी अर्थ खात्याकडून वारंवार नवीन माहिती आणि खुलासे मागविले जात असल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे. ऑडिट पूर्ण झाले, आवश्यक कागदपत्रे सादर केली, तरी पुन्हा-पुन्हा माहिती मागविण्याची प्रक्रिया सुरू असल्याने निधी मंजुरीला विलंब होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
‘सरकारला कर्मचाऱ्यांच्या कर्जाच्या हप्त्यांची, मुलांच्या शाळेच्या फीची किंवा घरखर्चाची चिंता नाही. मात्र, कागदांवर कागद मागविण्याची सवय काही सुटत नाही,’ अशी नाराजी बरगे यांनी व्यक्त केली.
कर्जाचे हप्ते, शाळेची फी अन् घरखर्चाचा ताण
एसटी कर्मचाऱ्यांपैकी अनेकांवर गृहकर्ज, वाहनकर्ज तसेच इतर आर्थिक जबाबदाऱ्या आहेत. महिन्याच्या ठराविक तारखेला वेतन मिळेल, या आधारावर त्यांचे आर्थिक नियोजन असते. मात्र, वेतन दोन-तीन दिवस उशिरा मिळाल्यास कर्जाचे हप्ते, शाळा व क्लासची फी, औषधोपचार, किराणा तसेच घरातील इतर खर्चांचे नियोजन बिघडते. काही वेळा विलंबामुळे अतिरिक्त व्याजाचा भारही सहन करावा लागू शकतो. प्रशासकीय विलंबाची किंमत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना मोजावी लागत असल्याची व्यथा बरगे यांनी व्यक्त केली.
‘दर महिन्याला पगारासाठी संघर्ष का?’
महिनाभर प्रामाणिकपणे सेवा बजावल्यानंतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काच्या वेतनासाठी दर महिन्याला प्रतीक्षा करण्याची वेळ का यावी, असा सवाल बरगे यांनी उपस्थित केला. एसटी कर्मचारी प्रवाशांना नियमित सेवा देत असताना त्यांच्या वेतनासाठी निधी मंजुरीच्या प्रक्रियेत वारंवार विलंब होत असल्याची टीकाही त्यांनी केली.
कोरोना काळ तसेच त्यानंतरच्या दीर्घकाळ चाललेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या काळात काही वेळा वेतन १० तारखेपर्यंत लांबले होते. आता पुन्हा वेतनाला विलंब झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष वाढला आहे. सोशल मीडियावरही वेतन विलंबाबाबत कर्मचाऱ्यांकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत असल्याचे संघटनेने सांगितले.
सोमवारी वेतन मिळण्याची शक्यता
दरम्यान, जुलै महिन्याचे वेतन सोमवार, १० ऑगस्ट रोजी कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे. मात्र, नेहमीच्या ७ तारखेऐवजी १० तारखेपर्यंत वेतन लांबल्याने नाराजी कायम आहे. एसटी महामंडळ आर्थिक अडचणींचा सामना करत असताना कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत देण्याचा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारने सवलत मूल्य प्रतिपूर्तीचा निधी वेळेत उपलब्ध करून देत कर्मचाऱ्यांना नियमित तारखेला वेतन मिळेल, अशी कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशी मागणी कर्मचारी संघटनेकडून करण्यात आली आहे.

