मुंबई प्रतिनिधी
मुंबई : सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाशी संबंधित प्रकरणाची सुनावणी सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठाकरे गटासह तृणमूल काँग्रेसमधून फुटलेल्या खासदारांची भेट घेतल्यावरून शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदींवर जोरदार टीका केली आहे. ‘भिऊ नका, मी तुमच्या पाठीशी आहे’, असे आश्वासन मोदींनी दिल्याचे सांगितले जात आहे. या वक्तव्यावरून ठाकरेंनी मोदींना थेट सवाल केले.
“सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना तुम्ही फुटीर खासदारांना का भेटलात? या भेटीतून नेमका कोणता संदेश द्यायचा होता? अमित शाह, देवेंद्र फडणवीस की न्यायालयाला धमकी द्यायची होती?” असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
मोदी आणि फुटीर खासदारांच्या भेटीवरून ठाकरे गटानेही केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली. खासदार संजय राऊत यांनी सकाळी या भेटीवरून मोदींना लक्ष्य केले. त्यानंतर पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनीही याच मुद्द्यावरून सरकारला घेरले.
‘मोदी नवे स्वामी समर्थ झाले का?’
“गद्दारांना मोदींनी ‘चिंता करू नका’ असे सांगितले. स्वामी समर्थ म्हणतात, ‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.’ आता मोदी नवे स्वामी झाले आहेत का?” असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
“मोदी आंदोलकांना, विद्यार्थ्यांना भेटत नाहीत; मात्र गद्दारांना भेटतात. केवळ भेटतच नाहीत, तर ‘मी तुमच्या पाठीशी आहे’ असेही सांगतात,” अशी टीका त्यांनी केली.
‘इन्स्टावरून देश चालवण्याची वेळ आली’
उद्धव ठाकरे यांनी मोदींच्या सोशल मीडिया माध्यमातून संवाद साधण्याच्या पद्धतीवरही टीका केली. “कोरोना काळात मी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत होतो, तेव्हा मला सुनावण्यात आले. आता पंतप्रधान तरुणांना भेटत नाहीत. मध्यरात्री ‘फ्रेंड्स’ म्हणून इन्स्टाग्रामवरून संदेश दिले जात आहेत. इन्स्टाग्रामवरून देश चालवण्याची वेळ आली आहे,” अशी बोचरी टीका ठाकरेंनी केली.
‘बंद दाराआडची चर्चा बाहेर का आली?’
मोदी आणि फुटीर खासदारांची भेट बंद दाराआड झाली असल्याचे सांगितले जात असताना त्यातील ‘भिऊ नका, मी तुमच्या पाठीशी आहे’ हे वाक्य बाहेर कसे आले, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
“या वक्तव्यातून कोणाला संदेश द्यायचा होता? सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीमुळे एकनाथ शिंदे टेन्शनमध्ये असल्याच्या बातम्या आहेत. त्यांच्यासाठी तर हा संदेश नाही ना? हा संदेश न्यायालयाला देण्यात आला आहे का? अमित शाह यांना धमकी देत आहेत का? की देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी हा संदेश आहे?” असे प्रश्न ठाकरेंनी उपस्थित केले.
“शिंदे पूर्वी अमित शाह यांना भेटायचे. आता मोदींना भेटत आहेत. अमित शाह इथे असताना मोदींची भेट घेऊन ‘भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे’ असा संदेश नेमका कुणाला दिला? शाहांना, कोर्टाला की फडणवीसांना?” असा थेट सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

