मुंबई,प्रतिनिधी
मुंबई महापालिकेच्या प्रशासनात गुरुवारी सहाय्यक आयुक्तांच्या स्तरावर मोठ्या प्रमाणावर फेरबदल करण्यात आले. सहा सहाय्यक आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या असून तीन कार्यकारी अभियंत्यांना सहाय्यक आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. तसेच एका सहाय्यक आयुक्ताची उपायुक्तपदी बढती करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या आदेशानुसार सामान्य प्रशासन विभागाने ३० जुलै रोजी बदली आदेश जारी केला असून संबंधित अधिकारी पदभार स्वीकारतील त्या दिवसापासून हा आदेश लागू होणार आहे.
गिरगाव-मुंबादेवी परिसराचा समावेश असलेल्या ‘सी’ विभागाच्या सहाय्यक आयुक्त अलका ससाणे यांची बदली ‘एम’ पूर्व विभागाच्या सहाय्यक आयुक्तपदी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी कार्यकारी अभियंता सुनील माने यांची ‘सी’ विभागाच्या सहाय्यक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच करनिर्धारण व संकलक विभागाचे सहाय्यक आयुक्त गजानन बेल्लाळे यांची मालमत्ता विभागाच्या सहाय्यक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली असून मालमत्ता विभागाचे सहाय्यक आयुक्त पृथ्वीराज चौहान यांना उपायुक्तपदी बढती देण्यात आली आहे.
याशिवाय उज्वल इंगोले यांची ‘एम’ पूर्व विभागातून ‘ए’ विभागाच्या सहाय्यक आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. वनिता कोकाटे यांची ‘के’ दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, स्वप्नजा क्षीरसागर यांच्याकडे जी-दक्षिण विभागाचा कार्यभार कायम ठेवत करनिर्धारक व संकलक पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. योगिता कोल्हे यांच्याकडे टी विभागासोबतच पूर्व उपनगर अतिक्रमण निर्मूलन विभागाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.
तसेच सुनील माने यांच्याकडे ‘सी’ विभागासोबत बाजार विभागाचा अतिरिक्त कार्यभार, तर जयदीप मोरे यांच्याकडे ‘एन’ विभागाच्या सहाय्यक आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. या फेरबदलांमुळे महापालिकेच्या विविध विभागांच्या प्रशासकीय कामकाजाला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


