छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : अन्न व औषध प्रशासनातील (एफडीए) कठोर निर्णय आणि शिस्तप्रिय कार्यपद्धतीसाठी ओळखले जाणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील राज्य अन्न व औषध प्रशासन प्रयोगशाळेतील २९ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहसंचालक तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीविरोधात अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
१५ जुलै रोजी सादर करण्यात आलेल्या निवेदनात कर्मचाऱ्यांनी प्रयोगशाळेत अचानक दोन शिफ्टमध्ये काम करण्याचा निर्णय घेतल्याचा आक्षेप नोंदविला आहे. या निर्णयामुळे सकाळी ९ वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत काम करावे लागत असून, शनिवार, रविवार तसेच सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशीही उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, प्रयोगशाळेत आधीच अनेक पदे रिक्त आहेत. पुरेसे तांत्रिक मनुष्यबळ आणि आवश्यक संसाधने उपलब्ध नसताना कामाचा वाढलेला ताण सहन करावा लागत आहे. भारतीय औषध संहिता (IP), ब्रिटिश फार्माकोपिया (BP) आणि युनायटेड स्टेट्स फार्माकोपिया (USP) यांच्या निकषांनुसार अन्न व औषध नमुन्यांची तपासणी करण्यासाठी पुरेसा वेळ आवश्यक असतो. मात्र, प्रलंबित नमुने तातडीने निकाली काढण्याच्या दबावामुळे तपासणीच्या गुणवत्तेशी तडजोड होण्याची शक्यता असल्याची भीतीही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
तक्रारपत्रातून कर्मचाऱ्यांनी दोन शिफ्टमध्ये काम करण्याचा निर्णय तातडीने मागे घेऊन पूर्वीची कार्यालयीन वेळ लागू करावी, सुट्ट्यांच्या दिवशी कामावर बोलावणे थांबवावे, अतिरिक्त कामासाठी नियमानुसार भत्ते व सुविधा द्याव्यात तसेच नमुन्यांच्या तपासणीत गुणवत्तेशी कोणतीही तडजोड होणार नाही, याची खात्री करावी, अशा प्रमुख मागण्या केल्या आहेत.
या निवेदनावर प्रयोगशाळेतील २९ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सह्या असून, या प्रकरणात अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री नरहरी झिरवाळ कोणता निर्णय घेतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


