छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी
नीट पेपरफुटी प्रकरण, शिक्षण व्यवस्थेतील कथित भ्रष्टाचार आणि तत्कालीन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टी (सीजेपी) आणि विविध विद्यार्थी संघटनांनी दिल्लीतील जंतरमंतर येथे तब्बल महिनाभर आंदोलन केले होते. या आंदोलनावर योगगुरू बाबा रामदेव यांनी केलेल्या टीकेनंतर आता सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी त्यांना सडेतोड प्रत्युत्तर देत नवा वाद निर्माण केला आहे.
आंदोलनामुळे भारताची प्रतिमा मलिन झाली असून देशातील तरुणांनी आंदोलनाऐवजी लोकशाही संस्थांवर विश्वास ठेवावा, असे मत बाबा रामदेव यांनी व्यक्त केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर अभिजीत दीपके यांनी तीव्र आक्षेप घेत, “देशाची बदनामी आंदोलनामुळे नव्हे, तर पेपरफुटीमुळे झाली आहे,” असा पलटवार केला.
काय म्हणाले होते बाबा रामदेव?
बाबा रामदेव यांनी आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणांवर टीका करत म्हटले होते, “Gen Z ने भारताला बदनाम केले आहे. शिवीगाळ करणे ही आपली संस्कृती नाही. आई-वडील, गुरू आणि ज्येष्ठांचा आदर करणे ही भारतीय परंपरा आहे. देश हा रस्त्यावर उतरून नव्हे, तर संसद आणि संविधानाच्या आधारे चालतो. शिक्षणमंत्री कोण असावा हे रस्त्यावर ठरत नाही, तर संसद आणि पंतप्रधान ठरवतात.”
या वक्तव्यानंतर सामाजिक आणि राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटल्या.
‘पेपरफुटीमुळे देशाची प्रतिमा डागाळली’ : दीपके
बाबा रामदेव यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना अभिजीत दीपके म्हणाले, “नीट पेपरफुटीसारख्या गंभीर प्रकारामुळे देशाची खरी बदनामी झाली आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या व्यवस्थेविरोधात आंदोलन करणे ही लोकशाहीची ताकद आहे, बदनामी नव्हे.”
ते पुढे म्हणाले, “आमच्या आंदोलनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांचे फोटो हातात घेऊन संविधानाच्या चौकटीत ‘जय भीम’च्या घोषणा दिल्या गेल्या. जर हे कोणाला देशाची बदनामी वाटत असेल, तर आम्ही संविधानिक मार्गाने लढा देत राहू.”
पतंजलीवरूनही साधला निशाणा
दीपके यांनी यावेळी बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीचाही उल्लेख करत टीका केली. “पतंजलीच्या उत्पादनांबाबत सर्वोच्च न्यायालयाने गंभीर ताशेरे ओढले आहेत. त्याऐवजी त्यांनी आधी स्वतःच्या कंपनीकडे लक्ष द्यावे. अन्यथा पतंजली बंद पडण्याची वेळ येईल,” असा टोला त्यांनी लगावला.
यासोबतच “संस्कृती, लोकशाही आणि संविधानाचा आदर कसा करायचा, हे Gen Z ला चांगले ठाऊक आहे,” असेही दीपके यांनी ठामपणे सांगितले.
वादाला नवे राजकीय परिमाण
बाबा रामदेव यांच्या वक्तव्यामुळे आणि त्यावर अभिजीत दीपके यांनी दिलेल्या प्रत्युत्तरामुळे हा वाद आता केवळ विद्यार्थी आंदोलनापुरता मर्यादित राहिलेला नसून तो सामाजिक, राजकीय आणि वैचारिक पातळीवरही चर्चेचा विषय ठरला आहे. पेपरफुटी, विद्यार्थ्यांचे आंदोलन, लोकशाहीतील आंदोलनाचा अधिकार आणि सार्वजनिक व्यक्तींच्या वक्तव्यांवरून पुन्हा एकदा देशभरात जोरदार चर्चा रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.


