संभाजीनगर प्रतिनिधी
काँकरोच जनता पार्टी (सीजेपी)च्या नेतृत्वाखाली दिल्लीत सुरू असलेले आंदोलन संपल्यानंतर या आंदोलनातील प्रमुख चेहरे आता आपापल्या शहरांकडे परतू लागले आहेत. सीजेपीचे संस्थापक आणि आंदोलनाचे प्रमुख नेते अभिजीत दीपके हे छत्रपती संभाजीनगरात परतले असून, त्यांच्या आगमनानंतर समर्थकांकडून त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. विमानतळावर पोहोचताच दीपके यांच्या गळ्यात पुष्पहार घालून आणि घोषणाबाजी करून कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी माध्यमांशी संवाद साधताना दीपके यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका करत भविष्यातील आंदोलनाची दिशा स्पष्ट केली. सरकारने विद्यार्थ्यांशी योग्य पद्धतीने वागले नाही, तर आगामी काळात विद्यार्थीच सत्ताधाऱ्यांना धडा शिकवतील, असा इशारा त्यांनी दिला. ‘आज केवळ धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला आहे. मात्र, सरकारने स्वत:मध्ये सुधारणा केली नाही, तर भविष्यात हेच विद्यार्थी सरकार बदलतील’, असे दीपके यांनी म्हटले.
‘४० दिवसांच्या संघर्षानंतर घरी परतलो’
संभाजीनगरात परतल्यानंतर बोलताना दीपके यांनी आपल्या आंदोलनाच्या कालावधीचा उल्लेख केला. ‘जवळपास ४० दिवसांच्या संघर्षानंतर मी माझ्या घरी परतलो आहे. भारतात आल्यानंतर आंदोलन सुरू झाले होते. मागील ३६ दिवसांपासून आम्ही जंतर-मंतरवर आंदोलन करत होतो. या संघर्षाला यश मिळाले असून, हा देशातील सर्व विद्यार्थ्यांचा विजय आहे. आज आई-वडिलांना भेटत असल्याचा मला विशेष आनंद आहे’, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
‘विद्यार्थी दहशतवादी नाहीत; ते देशाचे भवितव्य आहेत’
आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईवरही दीपके यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘२० जुलै रोजी सरकारच्या कारवाईमुळे विद्यार्थ्यांचे रस्त्यावर रक्त वाहिले. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. एवढे घडूनही सरकारचे समाधान झालेले दिसत नाही. विविध राज्यांमध्ये विद्यार्थ्यांना त्रास दिला जात आहे. काही विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना पोलिसांकडून त्रास दिला जात असल्याचे तसेच अटक आणि ताब्यात घेण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचे’ त्यांनी सांगितले.
‘विद्यार्थी हे दहशतवादी नाहीत. ते देशाचे भवितव्य आहेत. देशाच्या भवितव्याला अशा प्रकारे त्रास दिला जात असेल, तर त्याचे परिणाम सरकारला भविष्यात भोगावे लागतील’, असा इशाराही त्यांनी दिला.
‘आज एका मंत्र्यांचा राजीनामा; भविष्यात सरकार बदलण्याची वेळ येऊ शकते’
आंदोलनाच्या पुढील दिशेबाबत बोलताना दीपके यांनी केंद्र सरकारला थेट इशारा दिला. ‘आज केवळ धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला आहे. सरकारने योग्य पद्धतीने काम केले नाही आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले, तर भविष्यात हेच विद्यार्थी सरकार बदलतील’, असे ते म्हणाले.
त्यांच्या या वक्तव्यामुळे सीजेपीच्या आंदोलनाची पुढील दिशा काय असेल, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. दिल्लीत दीर्घकाळ चाललेल्या आंदोलनानंतर दीपके आता संभाजीनगरात परतले असले तरी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरचा संघर्ष संपलेला नसल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होत आहे.
दरम्यान, आंदोलनाच्या काळात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आणण्यात सीजेपीला यश आल्याचा दावा आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे. आता आंदोलनाची पुढील भूमिका आणि भविष्यातील रणनीती दीपके कशा प्रकारे ठरवतात, तसेच सरकारकडून विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर कोणती पावले उचलली जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


