स्वप्नील गाडे, गुन्हे वार्ताहर
मुंबई : मुंबईच्या निर्मलनगर पोलिसांनी एका सराईत दुचाकी चोरट्याला अटक करून त्याच्याकडून तब्बल तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत. अटक करण्यात आलेला आरोपी विवेक राजेंद्र कुमार गुप्ता (वय २३) हा मूळचा सांताक्रुझ पूर्व येथील असून तो रेपिडो चालक म्हणून काम करायचा. या कारवाईदरम्यान पोलिसांनी चोरीला गेलेली १०० टक्के मालमत्ता हस्तगत करण्यात यश मिळवले आहे.
याबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, फिर्यादी अक्षता कृष्णा मालप (वय ३३) यांनी २ जुलै २०२६ रोजी त्यांची टीव्हीएस कंपनीची ‘एनटॉर्क’ मोटरसायकल (क्र. MH 02 FQ 3992) वांद्रे येथील इंदिरानगर पोलीस चौकी शेजारील फुटपाथवर पार्क केली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी कामावर जाण्यासाठी आल्यावर त्यांना त्यांची दुचाकी त्या ठिकाणी मिळून आली नाही. याप्रकरणी त्यांनी तातडीने निर्मलनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा नोंदवून तपासाची चक्रे फिरवली.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक संतोष कोळगे आणि त्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळाला भेट दिली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली असता, एक संशयित इसम फिर्यादींची दुचाकी ढकलत चोरून नेत असल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले होते. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीचा मार्ग शोधून काढला आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीची ओळख पटवली. आरोपी विवेक गुप्ता हा सांताक्रुझमधील त्याच्या राहत्या घरी असल्याची खात्री पटताच पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
निर्मलनगर पोलीस ठाण्यात आणून त्याची सखोल चौकशी केली असता, त्याने या चोरीची कबुली दिली. इतकेच नव्हे तर, त्याने मुंबईच्या इतर भागांतूनही दुचाकी चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्याच्या चौकशीतून निर्मलनगर पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्या व्यतिरिक्त माहीम पोलीस ठाणे आणि सांताक्रुझ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येकी एक, असे एकूण ३ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. अटक करण्यात आलेल्या विवेक गुप्ता याच्यावर यापूर्वीही वाकोला, दहिसर, माहीम आणि आरपीएफ बांद्रा पोलीस ठाण्यात चोरी, रस्ता अपघात आणि इतर गंभीर स्वरूपाचे तब्बल ८ गुन्हे दाखल आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत पोलिसांनी आरोपीला कायदेशीररीत्या अटक केली आहे. ही यशस्वी कारवाई निर्मलनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष कोळगे, पोलीस अंमलदार खंडारे, वाघमारे, परदेशी, भोगले, कदम आणि कोळी यांच्या पथकाने केली आहे.


