सातारा प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून नद्या, नाले आणि ओढे दुथडी भरून वाहत आहेत. जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू असल्याने पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यासाठी महत्त्वाचे मानले जाणारे कोयना धरण मंगळवारी सकाळी 10 वाजेपर्यंत 33.93 टक्के भरले असून धरणात 35.71 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. सध्या धरणात तब्बल 93 हजार क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली.
जिल्ह्यात 7 जुलैअखेर 288.7 मिमी सरासरी पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. मंगळवारी जिल्ह्यातील 22 महसूल मंडळांमध्ये 65 मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला. त्यामध्ये महाबळेश्वरमध्ये सर्वाधिक 392.8 मिमी पावसाची नोंद झाली. तसेच लामज, बामणोली आणि तापोळा येथे प्रत्येकी 169 मिमी, वाठार 148.5 मिमी, पाचगणी 136.5 मिमी, करहर आणि केळघर येथे प्रत्येकी 124.5 मिमी, पसरणी 110.3 मिमी, तर पाटण येथे 100.5 मिमी पावसाची नोंद झाली.
90 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले
सततच्या पावसामुळे दरडप्रवण आणि धोकादायक ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांचे प्रशासनाने तातडीने स्थलांतर केले आहे. महाबळेश्वर, जावली आणि वाई तालुक्यातील विविध गावांतील एकूण 90 नागरिकांना अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा, मंदिरे तसेच नातेवाईकांच्या घरी सुरक्षित हलविण्यात आले आहे.
83 घरांचे नुकसान
अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 83 घरांची पडझड झाली आहे. पाटण तालुक्यात सर्वाधिक 39, वाईमध्ये 13, जावलीत 11, सातारा तालुक्यात 9, महाबळेश्वरमध्ये 9, तर खंडाळा तालुक्यात 2 घरांचे नुकसान झाले आहे. संबंधित पंचनाम्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
शाळा व सार्वजनिक मालमत्तेलाही फटका
सातारा तालुक्यातील केरी येथील प्राथमिक शाळेचे पत्रे वादळी वाऱ्यामुळे उडून गेले, तर खंडाळा तालुक्यातील मिरजे येथील प्राथमिक शाळा आणि स्मशानभूमीची संरक्षणभिंत कोसळल्याने नुकसान झाले आहे.
पर्यटनस्थळांवर निर्बंध
धबधबे, सखल भाग आणि धोकादायक पर्यटनस्थळांवर अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने पर्यटकांच्या प्रवेशावर निर्बंध लागू केले आहेत. नागरिकांनीही अनावश्यक प्रवास टाळून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठा
कोयना – 35.71 टीएमसी (33.93%)
धोम – 6.59 टीएमसी (48.81%)
धोम-बलकवडी – 2.17 टीएमसी (53.19%)
कण्हेर – 6.29 टीएमसी (62.28%)
उरमोडी – 4.50 टीएमसी (45.18%)
तारळी – 1.73 टीएमसी (29.57%)
यंत्रणांना सतर्कतेचे आदेश
झाडे उन्मळून पडणे, दरडी कोसळणे आणि रस्ते खचण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने सर्व यंत्रणांनी 24 तास सतर्क राहून अडथळे तातडीने दूर करावेत. तसेच धोकादायक भागातील नागरिकांचे आवश्यकतेनुसार त्वरित स्थलांतर करून त्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले आहेत.

