सोलापूर प्रतिनिधी
विजापूर येथे विवाह समारंभ आटोपून बिदरकडे परतणाऱ्या दोघांना डोळ्यांत चटणी टाकून, गळ्याला चाकू लावून लुटणाऱ्या टोळीचा सोलापूर शहर गुन्हे शाखेने अवघ्या पाच दिवसांत पर्दाफाश केला. तब्बल १०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज आणि चार हजारांहून अधिक मोबाईल क्रमांकांचा टॉवर डम्प डेटा तपासून पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून टमटम रिक्षासह ४ लाख ३५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी शिवाजी ऊर्फ मरक्या मोहन जाधव (३४) याने सख्खा भाऊ महादेव ऊर्फ मंड्या मोहन जाधव (२५) आणि मित्र अमित ऊर्फ इंडिया हरीशचंद्र पवार (३३) यांच्या मदतीने ही जबरी चोरी केल्याचे तपासात उघड झाले.
डोळ्यांत चटणी टाकून केली लूट
बिदर (कर्नाटक) येथील मल्लिकार्जुन विश्वनाथ कोणी आणि त्यांचे मित्र शांतकुमार रेवणप्पा येडवे हे २ जुलैच्या रात्री विजापूरहून बिदरकडे कारने निघाले होते. इंधन भरण्यासाठी त्यांनी विजापूर रोडवरील वडकबाळ पुलाजवळ कार थांबवली. त्याचवेळी रिक्षामधून आलेल्या तिघांनी कार अडवून मल्लिकार्जुन यांच्या गळ्याला चाकू लावला. डोळ्यांत चटणी फेकून त्यांच्या हातातील सोन्याच्या अंगठ्या हिसकावल्या आणि कारची चावी घेऊन आरोपी पसार झाले.
घटनेनंतर विजापूर नाका पोलिस आणि शहर गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. नूतन सहायक पोलिस निरीक्षक भरत चंदनशिव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा माग काढत त्यांना अटक केली.
तांत्रिक तपासामुळे गुन्ह्याचा उलगडा
आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांनी परिसरातील १०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. तसेच ४ ते ५ हजार मोबाईल क्रमांकांचा टॉवर डम्प डेटा पडताळून संशयितांची ओळख निश्चित केली. त्यानंतर सापळा रचून तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली.
मुख्य आरोपी शिवाजी जाधव याच्याविरुद्ध यापूर्वी २०१२ मध्ये मंद्रूप पोलिस ठाणे आणि २०१४ मध्ये विजापूर नाका पोलिस ठाणे येथे गुन्हे दाखल आहेत. तब्बल १२ वर्षांनंतर त्याने पुन्हा गंभीर गुन्हा केल्याचे तपासात समोर आले.
एपीआय भरत चंदनशिव यांची पहिलीच मोठी कामगिरी
एमआयडीसी पोलिस ठाण्यातून नुकतीच शहर गुन्हे शाखेत बदली झालेल्या सहायक पोलिस निरीक्षक भरत चंदनशिव यांच्या नेतृत्वाखालील पथकाची ही पहिलीच उल्लेखनीय कारवाई ठरली. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या पाच दिवसांत आरोपींना अटक करण्यात आल्याने शहर गुन्हे शाखेच्या तांत्रिक तपास कौशल्याची पुन्हा एकदा प्रचिती आली.
ही कारवाई पोलिस आयुक्त एम. राजकुमार, पोलिस उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, प्रीतम यावलकर, सहायक पोलिस आयुक्त दिलीप पवार आणि गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी अजित लकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.


