वसई प्रतिनिधी
जून महिन्याच्या उत्तरार्धात बराच काळ दडी मारलेल्या पावसाने अखेर वसई-विरार शहरात दमदार पुनरागमन केले. रविवारी मध्यरात्रीनंतर सुरू झालेल्या मुसळधार पावसाचा जोर सोमवारी सकाळपर्यंत कायम राहिल्याने शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले. त्यामुळे वाहतूक संथ झाली असून नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे.
विरार, नालासोपारा, वसई आणि नायगाव परिसरात पावसाचा सर्वाधिक प्रभाव जाणवला. विरारमधील कुंभारपाडा परिसरातील मुख्य रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. अनेक दुचाकीस्वारांना गुडघाभर पाण्यातून वाहने चालवत मार्ग काढावा लागला. नालासोपारा येथील श्रीप्रस्थ रस्ता तसेच वसईतील गोखीवरे परिसरातील प्रमुख रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले.
नायगाव पूर्वेतील सनटेक सिटी, परेरा नगर, बँक ऑफ इंडिया परिसरासह अनेक सखल भागांमध्येही रस्ते जलमय झाले. सकाळच्या कार्यालयीन वेळेत पावसाचा जोर कायम असल्याने नोकरी, व्यवसाय आणि अन्य कामांसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांना मोठी गैरसोय सहन करावी लागली. अनेक ठिकाणी वाहतुकीचा वेग मंदावल्याने वाहनांच्या रांगा लागल्या, तर काही मार्गांवर वाहतूक संथ गतीने सुरू होती.
दरम्यान, मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील शिरसाट फाटा परिसरातही पावसाचा जोर वाढल्याने प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संभाव्य पाणी साचण्याच्या ठिकाणांवर स्थानिक प्रशासन आणि संबंधित यंत्रणा सतर्क असून परिस्थितीवर सातत्याने नजर ठेवण्यात येत आहे.
शहरात पावसामुळे नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत असले, तरी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी हा पाऊस दिलासादायक ठरला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाअभावी रखडलेल्या पेरण्यांना आता वेग मिळण्याची आशा निर्माण झाली असून खरीप हंगामातील शेतीकामांना चालना मिळाली आहे. त्यामुळे बळीराजामध्ये समाधानाचे वातावरण असून दमदार पावसामुळे शेतीसाठी पोषक परिस्थिती निर्माण झाल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.


