यवतमाळ प्रतिनिधी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून फुटून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केलेल्या सहा खासदारांच्या मतदारसंघांच्या दौऱ्यावर असलेल्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षफुटीच्या पार्श्वभूमीवरील काही घडामोडींविषयी प्रथमच सविस्तर भाष्य केले. सहा खासदार फुटण्याच्या आदल्या रात्री आपण त्यांची मनधरणी करण्यासाठी अखेरपर्यंत प्रयत्न केल्याचा दावा करत, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याशी मध्यरात्री झालेल्या दूरध्वनीवरील संभाषणाचाही त्यांनी उल्लेख केला.
यवतमाळ, वाशीम आणि हिंगोली जिल्ह्यातील जाहीर सभांमध्ये बोलताना ठाकरे म्हणाले, “मी शेवटच्या क्षणापर्यंत माणसं जपण्याचा प्रयत्न केला. मध्यरात्री दीडच्या सुमारास आमदार कैलास पाटील आणि आमदार वरुण सरदेसाई यांना ओमराजे निंबाळकर यांची भेट घेण्यासाठी पाठवले होते. त्यावेळी माझे स्वतः ओमराजेंशी फोनवर बोलणे झाले. मी त्यांना स्पष्ट सांगितले की, ‘मला ओमराजे पाहिजेत, त्यांना खासदार पाहिजे आहेत. आता निर्णय तुम्ही घ्या.’ मी नेहमी माणसं जपणारा नेता राहिलो; मात्र आता कळत आहे की हा माणूस माणूस म्हणवून घेण्याच्याही पात्रतेचा नाही.”
“जनतेचा उमेदवार म्हणून संधी दिली, आता लाज वाटते”
फुटलेल्या खासदारांवर टीका करताना ठाकरे यांनी विशेषतः धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर निशाणा साधला. “धाराशिवच्या जनतेचा उमेदवार म्हणून मी त्यांना उमेदवारी दिली होती. आज त्यांच्या वागण्याची लाज वाटते. हा सगळा फसवणुकीचा प्रकार आहे,” असे ते म्हणाले.
याचबरोबर त्यांनी चार्टर्ड विमानांच्या वापरावरूनही प्रश्न उपस्थित केले. “आज त्यांच्या रिल्समध्ये परभणी, हिंगोली, यवतमाळ आणि धाराशिवचे खासदार चार्टर्ड विमानातून फिरताना दिसतात. एवढा पैसा कुठून आला? जनतेच्या विकासासाठी निधी मिळाल्याचे सांगितले जाते; पण हा निधी जनतेसाठी नसून स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी वापरला जात आहे,” असा आरोप ठाकरे यांनी केला.
बैठकीपूर्वीच संशय आला होता
सहा खासदारांनी पक्ष सोडण्यापूर्वीच त्यांच्या वागणुकीबद्दल संशय आल्याचा दावाही ठाकरे यांनी केला. त्यांनी सांगितले की, पक्षाच्या खासदारांची बैठक बोलावण्यात आली होती; मात्र संबंधित सहाही खासदारांनी वेगवेगळी कारणे देत अनुपस्थिती दर्शवली.
“यवतमाळच्या खासदारांनी मुलीच्या सोयरीकीचे कारण सांगितले. हिंगोलीच्या खासदारांनी मुलगा निवडणूक लढवत असल्याचे सांगितले. धाराशिवच्या खासदारांनी मुलगा रुग्णालयात असल्याचे सांगितले, तर शिर्डीच्या खासदारांनी पत्नी आजारी असल्याचे कारण दिले. मी सर्वांना समजून घेतले आणि न येण्यास परवानगी दिली,” असे ठाकरे म्हणाले.
मात्र, व्हिडीओ कॉन्फरन्सदरम्यान ओमराजे निंबाळकर यांच्या चेहऱ्यावरील तणाव आपल्या लक्षात आल्याचे त्यांनी सांगितले. “मी त्यांना विचारले, ‘तुमचा चेहरा ठीक दिसत नाही, काही तणाव आहे का? झोप झाली नाही का?’ त्यावर त्यांनी सर्व काही ठीक असल्याचे सांगितले. पण त्याच क्षणी माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यांच्या चेहऱ्यावर काहीतरी वेगळे दिसत होते आणि त्यांच्या मनात काहीतरी सुरू असल्याची जाणीव झाली होती,” असा दावा ठाकरे यांनी केला.
राजकीय वातावरण तापले
लोकसभा निवडणुकीनंतर शिंदे गटात गेलेल्या सहा खासदारांच्या मतदारसंघांत उद्धव ठाकरे यांनी दौरे सुरू केले असून, या माध्यमातून पक्षसंघटना मजबूत करण्याबरोबरच पक्षफुटीमागील घटनांवरही ते सातत्याने भाष्य करत आहेत. त्यांच्या या आरोपांमुळे राज्यातील शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला असून, संबंधित नेत्यांकडून यावर काय प्रतिक्रिया येते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


