रणजित मस्के,प्रतिनिधी
मुंबई : बनावट APK फाईलच्या माध्यमातून नागरिकांचे मोबाईल हॅक करून ऑनलाइन आर्थिक फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय सायबर टोळीचा मुंबई सायबर गुन्हे शाखेने मोठा पर्दाफाश केला आहे. झारखंड, बिहार आणि दिल्ली येथे समन्वित कारवाई करत सहा आरोपींना अटक करण्यात आली असून, तपासादरम्यान देशभरातील तब्बल ३,२०६ ऑनलाइन फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये या टोळीचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे. या गुन्ह्यांपैकी महाराष्ट्रातील ५१७, तर मुंबईतील ९३ गुन्ह्यांमध्ये आरोपी सहभागी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्राथमिक तपासानुसार या गुन्ह्यांमधून ४३ कोटी २५ लाख रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणात तक्रारदाराला महानगर गॅस लिमिटेडच्या नावाने ‘MGL GAS UNBLOCK FILE.apk’ ही बनावट APK फाईल मोबाईलवर पाठविण्यात आली होती. गॅस सेवा सुरू करण्याच्या बहाण्याने ही फाईल इन्स्टॉल करण्यास भाग पाडण्यात आले. फाईल इन्स्टॉल होताच मोबाईलवरील बँकिंग माहिती, संवेदनशील डेटा आणि इतर माहिती आरोपींच्या ताब्यात गेली. त्यानंतर तक्रारदाराच्या बँक खात्यातून २ लाख ३५ हजार रुपये लंपास करण्यात आले. या प्रकरणी मुंबई सायबर पोलीस ठाणे (पश्चिम विभाग) येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास करताना सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग काढला. त्यानंतर झारखंड, बिहार आणि दिल्ली येथे एकाच वेळी छापे टाकून सहा आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींकडून ११ मोबाईल फोन, ९ लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.
तपासादरम्यान आरोपी विविध बँका, आरटीओ तसेच महानगर गॅससारख्या संस्थांच्या नावाने ९९९ बनावट APK फाईल्स तयार करून नागरिकांना पाठवत असल्याचे उघड झाले. याशिवाय त्यांच्या ताब्यातून व्हॉट्सअॅप आणि टेलिग्राम ग्रुप, टेलिग्राम बॉट, सर्व्हर पॅनल लॉगिन क्रेडेन्शियल्स, विविध URL तसेच Google Firebase आणि Hostinger सर्व्हरवरील सुमारे १.२४ कोटी एसएमएस रेकॉर्ड जप्त करण्यात आले आहेत.
इतकेच नव्हे तर आरोपींकडून ८,६०९ मोबाईल क्रमांक, बँक खाते क्रमांक, एटीएम कार्डची माहिती, पिन, यूपीआय आयडीसह नागरिकांची संवेदनशील आर्थिक माहितीही पोलिसांच्या हाती लागली आहे. या माहितीचा वापर करून देशभरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन फसवणूक करण्यात येत असल्याचे तपासात स्पष्ट झाले.
मुंबई सायबर गुन्हे शाखेने जप्त केलेल्या डिजिटल डेटाचे आणि राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टल (NCRP) वरील तक्रारींचे विश्लेषण केल्यानंतर देशभरातील ३,२०६ फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये या टोळीचा थेट सहभाग असल्याचे समोर आले. या संपूर्ण रॅकेटचा विस्तार अनेक राज्यांमध्ये असून, संबंधित राज्यांच्या पोलिसांनाही याबाबत माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मुंबई सायबर गुन्हे शाखेकडून सुरू आहे.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस सहआयुक्त (गुन्हे) अनिल कुंभारे, अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपआयुक्त बजरंग बनसोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त इरफान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुवर्णा शिंदे, पोलीस निरीक्षक नितीन गच्चे, धनवेश पाटील, विजय घोरपडे, पोलीस उपनिरीक्षक दीपक तायडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश खुशलानी, तसेच पोलीस हवालदार आणि पोलीस शिपाई यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.


