स्वप्नील गाडे,प्रतिनिधी
मुंबई: खार परिसरातील एका नामांकित हॉटेलमध्ये शिरून लाखो रुपयांची रोकड आणि मोबाईल लंपास करणाऱ्या सराईत चोरट्याला खार पोलिसांनी अवघ्या १० तासांच्या आत अटक केली आहे. झडती दरम्यान पोलिसांनी चोरट्याकडून ६ लाख ३८ हजार २९० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
तक्रारदार यश शामसुंदर बांदकर हे लिंकिंग रोडवरील रेडिओ हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. २० जून २०२६ रोजी पहाटे ५.३० ते ५.५० च्या दरम्यान, अज्ञात चोरट्याने हॉटेलच्या काचेच्या दरवाजातून आत प्रवेश केला. चोरट्याने कॅश काउंटर फोडून ६ लाख ८१ हजार रुपये रोख आणि ५ हजार रुपये किमतीचा ओप्पो कंपनीचा मोबाईल, असा एकूण ६ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष तपास पथक तयार करण्यात आले. तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, पोलिसांनी आरोपीचा पवईतील फिल्टर पाडा परिसरात शोध घेतला. पोलिसांना पाहून आरोपी जाहिदअली रोशन अली कुरेशी उर्फ मुर्गी (वय २९, रा. पठाणवाडी, पवई) याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्हा कबूल केला असून, त्याच्याकडून चोरीची बहुतांश रक्कम आणि मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ, पोलीस निरीक्षक वैभव काटकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत सातपुते, पोलीस उपनिरीक्षक माणिक घोगरे यांच्यासह पोलीस अंमलदार आनंद निकम, अजित जाधव, संतोष कांबळे, अभिजीत कदम, गणेश खेडकर, सचिन चव्हाण आणि स्वप्नील काकडे यांच्या पथकाने केली. पोलीस पथकाने अत्यंत कमी वेळात गुन्हा उघडकीस आणल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


