गुहागर प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात असलेल्या ऐतिहासिक अंजरवेल येथील गोपाळगड किल्ल्यावर मालकी हक्काचा दावा करून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या अय्याज मणियार यांनी अखेर जाहीरपणे माफी मागितली आहे. “भावनेच्या भरात केलेले वक्तव्य चुकीचे होते. गोपाळगड हा शिवकालीन ऐतिहासिक वारसा असून त्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो,” असे म्हणत मणियार यांनी वाद शमवण्याचा प्रयत्न केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून गोपाळगड किल्ल्यावरील एका घटनेमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. दोन आंबे उचलल्याच्या कारणावरून काही पर्यटकांना किल्ल्यावर रोखून धरण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रकरणाने मोठे स्वरूप धारण केले. याच व्हिडिओमध्ये अय्याज मणियार यांनी गोपाळगड हा त्यांच्या मालकीचा असल्याचा दावा केल्याने शिवप्रेमी, दुर्गप्रेमी आणि इतिहास अभ्यासकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
माफीनाम्यात काय म्हटले?
शिवतेज फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड. संकेत साळवी यांच्या उपस्थितीत अय्याज मणियार यांनी जाहीर माफीनामा सादर केला. यावेळी त्यांनी गोपाळगड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी संबंधित महत्त्वाचा वारसा असल्याचे मान्य केले. तसेच कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी वादग्रस्त वक्तव्याबद्दल खेद व्यक्त केला.
मणियार यांच्या या भूमिकेनंतर गेल्या काही दिवसांपासून पेटलेला वाद काही प्रमाणात शांत होण्याची चिन्हे दिसत असली तरी या प्रकरणाचा पुढील परिणाम काय होणार याकडे संपूर्ण कोकणासह राज्याचे लक्ष लागले आहे.
नेमके काय घडले होते?
गोपाळगड हा राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेला ऐतिहासिक किल्ला आहे. पूर्वी महसूल आणि पुरातत्त्व विभागातील काही त्रुटींमुळे किल्ल्याच्या मालकी हक्कासंदर्भात वाद निर्माण झाला होता. मात्र न्यायालयीन प्रक्रियेनंतर या किल्ल्याला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा कायम ठेवण्यात आला.
अशा परिस्थितीत काही दिवसांपूर्वी पर्यटनासाठी आलेल्या सागर पवार यांच्या कुटुंबासोबत वाद झाल्याचा आरोप समोर आला. किल्ला परिसरातील दोन आंबे उचलल्याच्या कारणावरून पर्यटकांना रोखून धरण्यात आल्याचे सांगितले जाते. या घटनेदरम्यान अय्याज मणियार यांनी किल्ला आपल्या मालकीचा असल्याचा दावा केल्याचे व्हिडिओत दिसून आले. त्यानंतर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आणि “शिवरायांचा किल्ला खासगी मालमत्ता कसा असू शकतो?” असा सवाल उपस्थित करण्यात आला.
दुर्गप्रेमी संघटना आक्रमक
या घटनेनंतर विविध दुर्गसंवर्धन आणि शिवप्रेमी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. राज्य संरक्षित स्मारकावर कोणत्याही व्यक्तीचा खासगी मालकी हक्क असू शकत नाही, असे मत व्यक्त करत संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.
शिवतेज फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड. संकेत साळवी यांनी प्रशासनाला निवेदन देत, पर्यटकांना दमदाटी करणे किंवा डांबून ठेवण्याचा प्रयत्न करणे ही गंभीर बाब असल्याचे म्हटले आहे. या संपूर्ण घटनेची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
गोपाळगडाला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा कायम ठेवण्याची मागणी
दरम्यान, गोपाळगड किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता त्याच्या संवर्धनासाठी आणि संरक्षणासाठी शासनाने अधिक ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही जोर धरू लागली आहे. किल्ल्याला राज्य संरक्षित स्मारक म्हणून अधिक प्रभावी संरक्षण मिळावे यासाठी विविध संस्था सातत्याने पाठपुरावा करत आहेत.
अय्याज मणियार यांच्या माफीनाम्यानंतर वादाला तात्पुरता विराम मिळण्याची शक्यता असली तरी गोपाळगडच्या मालकी, संवर्धन आणि पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.


