सातारा प्रतिनिधी
प्रतिकूल परिस्थिती, आर्थिक अडचणी आणि वैयक्तिक दुःख यांवर मात करत जिल्ह्यातील काही तरुण-तरुणींनी पोलिस भरतीत यश संपादन करत खाकी वर्दीचे स्वप्न साकार केले आहे. या यशाने केवळ कुटुंबीयच नव्हे, तर गावागावांत अभिमानाची भावना निर्माण झाली असून, जिद्द, सातत्य आणि कष्ट यांच्या जोरावर मिळवलेले हे यश अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
साताऱ्याच्या ग्रामीण भागातून आलेल्या या यशकथांमध्ये एक समान धागा दिसतो-अडचणींना शरण न जाता स्वप्नांचा पाठलाग करण्याची वृत्ती. कास परिसरातील एकीवमुरा (ता. जावळी) येथील गौरी बजरंग गोरे हिने सर्व प्रतिकूलता झुगारून मुंबई पोलिस दलात स्थान मिळवत गावातील पहिली महिला पोलिस होण्याचा मान मिळवला आहे. माथाडी कामगार असलेल्या व अक्षरओळख नसलेल्या वडिलांची लेक असलेल्या गौरीने शिक्षणासाठी उपलब्ध मर्यादित साधनांवरच समाधान न मानता अभ्यास आणि जिद्दीच्या जोरावर यशाची वाटचाल केली.
तर पाचगणी येथील सर्वसामान्य कुटुंबातील कोमल आत्माराम गायकवाड हिचीही मुंबई पोलिस दलात पोलिस शिपाई पदावर निवड झाली आहे. लहानपणीच वडिलांचे छत्र हरपल्यानंतर आईने संसाराचा भार सांभाळत मुलीच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. आईच्या कष्टांची परतफेड म्हणून कोमलने उराशी बाळगलेले खाकी वर्दीचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले.
फलटण तालुक्यातील आदेश तानाजी साळुंखे यानेही आईच्या संघर्षाला यशाची जोड देत नवी मुंबई पोलिस दलात पोलिस शिपाई पद मिळवले आहे. वडिलांच्या निधनानंतर आईने मोलमजुरी करून मुलाला उभे केले आणि मुलाने कष्टाचे चीज करत यशाचा टप्पा गाठला.
जावळी तालुक्यातील केळघर गावात तर यंदा वेगळाच आनंद पाहायला मिळत आहे. अंगणवाडी सेविका असलेल्या आई आणि शेती करणाऱ्या वडिलांच्या कष्टाचे फळ म्हणून मेघा, कुणाल आणि अक्षय धनावडे या भावंडांनी वेगवेगळ्या क्षेत्रांत यश मिळवले आहे. कुणालला पोलिस भरतीत सलग अपयश आले, पण त्याने हार न मानता अखेर यश खेचून आणले. तर अक्षयची मंत्रालयात नियुक्ती आणि मेघाच्या पोलिस दलातील भरतीनंतर आता कुणालच्या यशाने कुटुंबाच्या आनंदात भर पडली आहे.
या सगळ्या आनंदाच्या क्षणांमध्ये मात्र कोमलच्या मनात एक हळवा कोपरा कायम राहिला. गाव जल्लोषात असताना तिच्या डोळ्यांत आनंदाबरोबरच एक न बोलता येणारी पोकळी दिसत होती. कारण खाकी वर्दीचे स्वप्न पूर्ण झाले होते, पण त्या वर्दीतील मुलीच्या खांद्यावर अभिमानाने हात ठेवायला तिचे वडील आज हयात नव्हते.
साताऱ्यातील या तरुणांच्या यशकथा केवळ भरतीच्या निकालापुरत्या मर्यादित नाहीत; त्या ग्रामीण भारतातील संघर्ष, मातृत्वाची ताकद आणि अपयशावर मात करत उभे राहण्याची नवी प्रेरणा ठरत आहेत. खाकीच्या दिशेने टाकलेले हे पाऊल अनेक नव्या स्वप्नांना दिशा देणारे ठरत आहे.


