मुबई प्रतिनिधी
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेमुळे जगभरातील मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांकडून कर्मचारी कपातीचा सपाटा सुरू असतानाच आता मेटा च्या भारतीय कर्मचाऱ्यांनाही त्याचा फटका बसला आहे. फेसबुकची मूळ कंपनी असलेल्या मेटाने भारतातील जाहिरात विक्री, विपणन आणि इंडिविज्युअल काँट्रीब्यूटर विभागांतील काही कर्मचाऱ्यांना अचानक सेवामुक्त केल्याची माहिती समोर आली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, संबंधित कर्मचाऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना किंवा प्रत्यक्ष चर्चा न करता मध्यरात्री ‘कोल्ड ईमेल’ पाठवून नोकरी समाप्तीची माहिती देण्यात आली. विशेष म्हणजे, अनेक कर्मचाऱ्यांना पहाटे चारच्या सुमारास ईमेल प्राप्त झाल्याने कंपनीच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त होत आहे.
काढून टाकण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून चार ते सहा महिन्यांच्या वेतनाइतकी रक्कम देण्याची ऑफर देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या घडामोडींवर मेटा इंडियाकडून अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
उद्योग क्षेत्रातील अंदाजानुसार, मेटाच्या भारतातील कार्यालयांमध्ये सुमारे ४०० कर्मचारी कार्यरत आहेत. कंपनीने अलीकडेच जागतिक स्तरावर मोठ्या पुनर्रचनेची घोषणा केली असून, त्याअंतर्गत सुमारे ८ हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गंडांतर आले आहे. याशिवाय, जवळपास ७ हजार कर्मचाऱ्यांना एआय-संबंधित नव्या प्रकल्पांमध्ये स्थानांतरित करण्यात आले आहे.
कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी कर्मचाऱ्यांना उद्देशून केलेल्या अंतर्गत संवादात, “एआय हे आपल्या पिढीतील सर्वात प्रभावी तंत्रज्ञान असून, भविष्यात आघाडी घेण्यासाठी संस्थात्मक बदल आवश्यक आहेत,” असे स्पष्ट केले असल्याचे समजते.
दरम्यान, मेटाने आर्थिक वर्ष २०२६ साठी भांडवली खर्चाचा अंदाज १२५ ते १४५ अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवला आहे. एआय क्षेत्रातील गुंतवणुकीत कंपनीने तब्बल ८७ टक्क्यांची वाढ केल्याची माहितीही समोर आली आहे. कमी व्यवस्थापकीय स्तर, अधिक वेगवान निर्णयप्रक्रिया आणि लहान पण कार्यक्षम टीम उभारण्याच्या उद्देशाने ही पुनर्रचना करण्यात येत असल्याचे कंपनीकडून सांगितले जात आहे.


