मुंबई प्रतिनिधी
भाईंदर : मिरा रोड येथील पूनम क्लस्टर गृहसंकुलात बकरी ईद निमित्त आणलेल्या बकऱ्यांवरून निर्माण झालेल्या वादानंतर आंदोलनकर्त्यांविरोधात काशिमीरा पोलीस ठाण्यात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, प्राण्यांना अमानुष वागणूक देणे आणि मारहाणीच्या आरोपांखाली ही कारवाई करण्यात आली आहे.
मिरा रोडमधील उच्चभ्रू पूनम क्लस्टर गृहसंकुलात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे आणण्यात आले होते. त्यानंतर काही रहिवाशांनी बकरे इमारतीबाहेर काढण्याची मागणी केली. यावरून सोसायटी पदाधिकारी आणि काही रहिवाशांमध्ये वाद निर्माण झाला. पुढे या प्रकरणात काही हिंदुत्ववादी संघटनांनी उडी घेत आंदोलन सुरू केले.
मंगळवारी गृहसंकुलाबाहेर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. आंदोलनादरम्यान काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत बकरे बाहेर काढण्याची मागणी केली. तसेच परिसरात तीन डुकरे आणण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली. याशिवाय एका मुस्लिम व्यक्तीला मारहाण झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून बकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या सूचना मिरा-भाईंदर महापालिकेला दिल्याची माहिती समोर आली आहे. तसेच पोलिसांना योग्य ती कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
काशिमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या माहितीनुसार, जमावबंदी आदेश लागू असतानाही परिसरात जमाव जमवल्याप्रकरणी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच डुकरांना अमानुष वागणूक देणे आणि एका व्यक्तीला मारहाण केल्याप्रकरणी आणखी दोन स्वतंत्र गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.


