मुंबई प्रतिनिधी
मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानक परिसर आज पहाटेपासून अक्षरशः पोलिस छावणीत बदलला होता. वांद्रे पूर्वेकडील रेल्वेच्या जागेवर उभारण्यात आलेल्या ‘गरीब नवाज’ झोपडपट्टीवर रेल्वे प्रशासनाने मोठी तोडक कारवाई करत बुलडोझर फिरवला. विशेष म्हणजे या झोपड्यांपैकी अनेक झोपड्या तीन मजली, चार मजली तर काही दुमजली असल्याने त्या प्रत्यक्षात मिनी इमारतींसारख्याच दिसत होत्या.
#WATCH | Mumbai: Western Railway conducts an anti-encroachment drive in Garib Nagar, Bandra (East).
This drive is being carried out in coordination with the civic administration, police officials, and railway security agencies to ensure that law and order are maintained pic.twitter.com/yHCEB0Ivz3
— ANI (@ANI) May 19, 2026
रेल्वेच्या जागेवर वर्षानुवर्षे उभ्या असलेल्या या बेकायदेशीर बांधकामांवर अखेर आज सकाळपासून कारवाईला सुरुवात करण्यात आली. पहाटेपासूनच सहा बुलडोझर, मोठा पोलिस बंदोबस्त आणि रेल्वे सुरक्षा दलाचा फौजफाटा परिसरात दाखल झाला होता. त्यामुळे संपूर्ण परिसरात तणावपूर्ण शांतता पाहायला मिळाली.
1000 हून अधिक पोलीस तैनात
कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी तब्बल 1000 हून अधिक पोलीस आणि सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते. RPF, GRP आणि मुंबई पोलिसांचा संयुक्त बंदोबस्त परिसरात ठेवण्यात आला होता. परिस्थिती नियंत्रणात राहावी म्हणून वांद्रे पूर्व रेल्वे स्थानकाजवळील दोन पादचारी पूल तात्पुरते बंद करण्यात आले.
स्थानिकांच्या गर्दीमुळे काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला होता. अनेक रहिवासी घरातील सामान बाहेर काढताना दिसून आले. महिलांचा आक्रोश, लहान मुलांची धावपळ आणि घर उद्ध्वस्त होत असल्याचं दृश्य पाहून परिसरात भावनिक वातावरण निर्माण झालं होतं.
तीन-चार मजली झोपड्या पाहून प्रशासनही चक्रावले
या कारवाईतील सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे अनेक झोपड्यांवर थेट तीन ते चार मजले बांधण्यात आले होते. अरुंद गल्ल्यांमध्ये उभ्या असलेल्या या अनधिकृत बांधकामांनी संपूर्ण रेल्वे परिसर व्यापला होता. काही घरांमध्ये भाडेकरू राहत असल्याची माहितीही समोर आली आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने भविष्यातील रेल्वे विस्तार प्रकल्प अडकले होते. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार ही मोहीम हाती घेण्यात आली.
नवीन रेल्वे मार्गासाठी जमीन मोकळी
पश्चिम रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केलं आहे की, नवीन रेल्वे मार्ग टाकण्यासाठी ही जागा अत्यावश्यक आहे. भविष्यातील रेल्वे वाहतूक वाढ, अतिरिक्त लाईन आणि स्थानक विस्ताराच्या दृष्टीने हा परिसर मोकळा करणे गरजेचे होते.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी सांगितले की, “उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ही कारवाई केली जात आहे. रेल्वे प्रकल्पांसाठी जागा मोकळी करणे अत्यावश्यक आहे.”
दोन दिवस चालणार मोहीम
रेल्वे प्रशासनाकडून ही मोहीम दोन दिवस चालणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे 140 झोपड्या हटवण्यात येणार असून पुढील काही तासांत आणखी बांधकामांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
कारवाईपूर्वी अनेक रहिवाशांनी स्वतःहून घरे रिकामी करण्यास सुरुवात केली होती. काहीजण घरातील साहित्य ट्रकमध्ये भरताना दिसले, तर काही कुटुंबे उघड्यावर येण्याच्या भीतीने हवालदिल झाली होती.
“नोटीसच दिली नाही”; रहिवाशांचा आरोप
दरम्यान, स्थानिक नागरिकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे. रहिवाशांचा आरोप आहे की, त्यांना पुरेशी पूर्वसूचना देण्यात आलेली नाही. “आम्हाला घराच्या बदल्यात पर्यायी घर द्यावं. अचानक घरं पाडली जात आहेत. आम्ही आता कुठे जायचं?” असा सवाल अनेक रहिवाशांनी उपस्थित केला.
स्थानिकांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजीही केली. मात्र मोठ्या पोलिस बंदोबस्तामुळे परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात यश आलं.
मुंबईतील अतिक्रमणांवर पुन्हा मोठा प्रश्न
या कारवाईनंतर मुंबईतील वाढत्या अनधिकृत बांधकामांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. रेल्वेच्या जागांवर वर्षानुवर्षे उभ्या राहणाऱ्या झोपड्या, त्यांचे वाढते मजले आणि त्यामागील यंत्रणा यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. प्रशासनाच्या नाकावर टिच्चून एवढ्या मोठ्या प्रमाणात बांधकाम कसं उभं राहिलं? याबाबतही चर्चा सुरू झाली आहे.


