मुंबई प्रतिनिधी
ज्येष्ठ काँग्रेस नेते तथा माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचे चिरंजीव आणि मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांचे बंधू तुषार एकनाथराव गायकवाड यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षासह सामाजिक व राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
तुषार गायकवाड हे मुंबई काँग्रेसचे महासचिव म्हणून कार्यरत होते. संघटनात्मक कामकाजात त्यांचा सक्रिय सहभाग होता. कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क ठेवत पक्षबांधणीसाठी ते प्रयत्नशील असल्याने मुंबई काँग्रेसमध्ये त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली होती. त्यांच्या अकाली निधनाने गायकवाड कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
तुषार गायकवाड यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन आज दुपारी १ ते २ या वेळेत विक्रोळी येथील निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी २ ते ४ या वेळेत अभय शिक्षण संस्थेच्या प्रांगणात पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. सायंकाळी टागोर नगर येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
तुषार गायकवाड यांच्या निधनाची बातमी समजताच काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी तसेच विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी गायकवाड कुटुंबीयांचे सांत्वन केले. सोशल मीडियावरही अनेकांनी श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याची आठवण काढली आहे.
मुंबईतील सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात गायकवाड कुटुंबाचे मोठे योगदान राहिले असून तुषार गायकवाड यांच्या निधनामुळे या क्षेत्रातही शोककळा पसरली आहे.


