मुंबई प्रतिनिधी
सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या रखडलेल्या विधान परिषद निवडणुकीची अखेर घोषणा झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा तापू लागले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पारंपरिक बालेकिल्ल्यात गेल्या काही वर्षांत भाजपने निर्माण केलेली ताकद आणि त्याचवेळी महायुतीतील वाढता अंतर्गत विसंवाद, या दोन्ही गोष्टी निवडणुकीचा निकाल ठरवणाऱ्या ठरणार आहेत.
गेल्या चार वर्षांपासून रखडलेली ही निवडणूक आता होत असल्याने जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायत आणि पंचायत समित्यांमधील नव्या समीकरणांची खरी परीक्षा लागणार आहे. सातारा आणि सांगली जिल्ह्यांत भाजपचे संख्याबळ वाढले असले तरी मित्रपक्षांतील नाराजी महायुतीसाठी मोठे आव्हान मानले जात आहे.
२०१४ नंतर भाजपने पश्चिम महाराष्ट्रात संघटनात्मक पातळीवर आक्रमक विस्तार सुरू केला. ग्रामपंचायतीपासून लोकसभा-विधानसभा निवडणुकांपर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांना पक्षात घेत भाजपने मजबूत पाया उभारला. त्याचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही दिसून आला. साताऱ्यात भाजपने लक्षणीय वर्चस्व निर्माण केले, तर सांगलीतही पक्षाने महत्त्वाची ताकद उभी केली.
मात्र, जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांदरम्यान भाजप व मित्रपक्षांमध्ये निर्माण झालेला दुरावा आता चर्चेचा विषय ठरत आहे. साताऱ्यात जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये तणाव निर्माण झाला होता. शिवसेनेकडे ताकद असतानाही भाजपने अध्यक्षपद मिळवल्याने शिंदे गट नाराज असल्याची चर्चा आहे. सांगलीतही भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील मतभेद उघडपणे समोर आले होते.
महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे मित्रपक्षांमध्ये अस्वस्थता वाढल्याचे दिसून आले. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भूमिकेबाबतही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत महायुतीची एकजूट कितपत टिकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडीत काँग्रेस आणि शरद पवार गटाची ताकद साताऱ्यात कमी झाल्याचे चित्र असले तरी सांगलीत अजूनही काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रभावी अस्तित्व कायम आहे. खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम, जयंत पाटील आणि रोहित पाटील यांनी सांगलीत आघाडीची ताकद टिकवून ठेवली आहे. त्यामुळे सांगलीत लढत चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
साताऱ्यात भाजपकडे सर्वाधिक स्थानिक प्रतिनिधी असल्याने उमेदवारीवर भाजपचा दावा मजबूत मानला जात आहे. विक्रम पावसकर, धैर्यशील कदम आणि सत्यजित पाटणकर यांची नावे चर्चेत आहेत. राष्ट्रवादीकडून प्रभाकर देशमुख आणि शेखर गोरे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. सांगलीत सम्राट महाडिक आणि वैभव पाटील यांची नावे आघाडीवर मानली जात आहेत.
सातारा जिल्ह्यात महायुतीकडे सुमारे २१० मतांचे संख्याबळ असून महाविकास आघाडी अत्यल्प संख्येत आहे. भाजपकडे सर्वाधिक नगरसेवक व सभापती आहेत. सांगलीतही महायुती मजबूत असली तरी महाविकास आघाडीचे संख्याबळ लक्षणीय आहे. त्यामुळे या निवडणुकीत केवळ आकडेमोड नव्हे तर नाराज मित्रपक्ष, अंतर्गत डावपेच आणि स्थानिक राजकीय समीकरणे निर्णायक ठरणार आहेत.
महायुतीकडे स्पष्ट वरचष्मा असला तरी अंतर्गत असंतोषामुळे निवडणुकीचे गणित बिघडण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. त्यामुळे सातारा-सांगली विधान परिषद निवडणूक ही केवळ संख्याबळाची नव्हे, तर प्रतिष्ठा आणि राजकीय रणनीतीची लढत ठरणार आहे.


