मुंबई प्रतिनिधी
आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचे पडसाद आता भारतात उमटू लागले असून, इंधन बचत, परकीय चलनाची बचत आणि स्वदेशीला प्राधान्य देण्याबाबत केंद्र सरकारने जनतेला सजग राहण्याचं आवाहन केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यातील जनतेला काटकसर आणि ऊर्जा बचतीसाठी पुढाकार घेण्याचं आवाहन केलं आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या अधिकृत X (ट्विटर) अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करत नागरिकांना साध्या-सोप्या सवयी बदलून देशहितासाठी योगदान देण्याचं आवाहन केलं. “देश कठीण परिस्थितीतून जात असताना आपण सर्वांनी एकसंधपणे उभं राहणं गरजेचं आहे,” असा संदेश त्यांनी दिला.
राष्ट्रप्रथम या भावनेने एकजूट होऊया
आखाती युद्धामुळे सध्या जी परिस्थिती ओढवली आहे, त्यातून मार्ग काढण्यासाठी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी देशवासियांना इंधन बचत, परकीय चलन बचत आणि स्वदेशीला प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे. यासाठी देशाने एकसंधपणे उभे राहणे गरजेचे आहे.… pic.twitter.com/TA4J3Kas9b
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 18, 2026
“इंधन आणि सोन्याची आयात कमी करणं काळाची गरज”
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भारत मोठ्या प्रमाणावर पेट्रोल, डिझेल आणि सोन्याची आयात करतो. त्यामुळे परकीय चलनाचा मोठा खर्च होतो. आखाती देशांतील तणावपूर्ण परिस्थितीमुळे जागतिक बाजारपेठेवर परिणाम होत असून, अशा काळात देशवासीयांनी जबाबदारीने वागणं आवश्यक आहे.
“पंतप्रधान मोदी यांनी इंधन बचतीसाठी पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करण्याचा सल्ला दिला आहे. तसंच सोनं खरेदी टाळण्याचंही आवाहन केलं आहे. कारण सोनं आयात केलं जातं आणि त्यामुळे देशाचा पैसा परकीय चलनाच्या स्वरूपात बाहेर जातो,” असं मुख्यमंत्री म्हणाले.
त्यांनी पुढे स्पष्ट केलं की, “कुणाला राजकारण करायचं असेल तर करू द्या. पण अशा परिस्थितीत देशासाठी एकजूट दाखवणं अधिक महत्त्वाचं आहे.”
‘ई-वाहनं घ्या, कारपूल करा, नो व्हेईकल डे पाळा’
मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागरिकांना दैनंदिन जीवनात काही बदल करण्याचं आवाहन केलं. त्यामध्ये सार्वजनिक वाहतुकीचा वापर, कारपूलिंग, वीज बचत आणि घरगुती स्तरावर काटकसर यांचा समावेश आहे.
त्यांनी सुचवलेल्या उपाययोजना अशा :
नवीन वाहन खरेदी करताना शक्यतो इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य द्या
मेट्रो, ई-बसेस आणि सार्वजनिक वाहतुकीचा जास्तीत जास्त वापर करा
चार मित्रांनी मिळून एकाच वाहनातून प्रवास करा
आठवड्यातून एक दिवस ‘नो व्हेईकल डे’ पाळण्याचा प्रयत्न करा
शक्य असल्यास ‘वर्क फ्रॉम होम’चा पर्याय वापरा
एसीचा वापर २४ डिग्री सेल्सियसच्या खाली करू नका
परदेश दौरे टाळा आणि भारतात पर्यटनाला प्रोत्साहन द्या
“कोविड काळात आपण वर्क फ्रॉम होममध्ये पारंगत झालो आहोत. त्यामुळे गरज पडल्यास पुन्हा त्या पर्यायाचा विचार करू शकतो,” असंही त्यांनी सांगितलं.
सरकारनेही घेतले निर्णय
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं की, सरकारनेही काटकसरीसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. “मी माझा ताफा अर्ध्यावर आणला आहे. मंत्री आणि अधिकाऱ्यांचे परदेश दौरे रद्द करण्यात आले आहेत. सरकार पातळीवर आणखी काही निर्णय घेतले जात आहेत,” अशी माहिती त्यांनी दिली.
तसंच, उद्योग क्षेत्र आणि इतर संबंधित घटकांचं हित अबाधित राहील, याची काळजी घेत निर्णय घेतले जातील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
“राष्ट्र प्रथम”ची भावना जपण्याचं आवाहन
“गेल्या १२ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला नव्या उंचीवर नेलं आहे. त्यामुळे त्यांच्या आवाहनाला साथ देणं हेच भारताच्या हिताचं आहे,” असं सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागरिकांना ‘राष्ट्र प्रथम’ या भावनेतून एकजूट होण्याचं आवाहन केलं.
“छोट्या छोट्या बदलांतूनही आपण देशसेवा करू शकतो. चला, आपण सारे मिळून या अभियानात सहभागी होऊ या,” असा भावनिक संदेश त्यांनी राज्यातील जनतेला दिला.


