जालना प्रतिनिधी
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा राज्यातील राजकारण तापण्याची चिन्हे दिसू लागली असून, मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी ३० मेपासून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषण आणि तीव्र आंदोलन छेडण्याची घोषणा केली आहे. राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाची दिशाभूल आणि फसवणूक केल्याचा गंभीर आरोप करत जरांगे यांनी सरकारला २९ मेपर्यंतची मुदत दिली आहे.
शनिवारी अंतरवाली सराटी येथे झालेल्या जाहीर बैठकीत राज्यभरातून मोठ्या संख्येने मराठा बांधव, कार्यकर्ते आणि युवक सहभागी झाले होते. यावेळी बोलताना जरांगे यांनी सरकारवर थेट हल्लाबोल करत अनेक प्रलंबित मागण्यांची आठवण करून दिली. “सरकारने मुंबईतील आंदोलनावेळी दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण केलेली नाहीत. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत सरकारने शब्द दिला होता. मग आता ही प्रक्रिया का रोखली जात आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
‘२९ मेपर्यंत निर्णय घ्या, अन्यथा आंदोलन अटळ’
जरांगे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, सरकारने २९ मेपर्यंत खालील मागण्यांची अंमलबजावणी करावी, अन्यथा ३० मेपासून तीव्र आंदोलन उभारले जाईल.
त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रांचे तातडीने वाटप, सातारा व हैदराबाद संस्थानांच्या गॅजेटनुसार अध्यादेश लागू करणे, आंदोलनादरम्यान दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घेणे, तसेच आंदोलनात बलिदान दिलेल्या युवकांच्या कुटुंबियांना महावितरण आणि औद्योगिक क्षेत्रात नोकरी देण्यासाठी स्वतंत्र अध्यादेश काढणे यांचा समावेश आहे.
“सरकारकडे अजून वेळ आहे. पण २९ मेनंतर समाज रस्त्यावर उतरेल. यावेळी आंदोलन अधिक व्यापक असेल,” असा इशाराही त्यांनी दिला.
‘५८ लाख नोंदींना प्रमाणपत्र द्या’
मराठा आरक्षणाच्या संदर्भात सापडलेल्या कथित ५८ लाख नोंदींचा मुद्दा उपस्थित करत जरांगे म्हणाले की, या सर्व नोंदींना तातडीने वैधता देऊन संबंधितांना प्रमाणपत्रे द्यावीत. ग्रामपंचायत स्तरावर नोंदी करण्याचे आदेश द्यावेत, सातारा संस्थानचा अध्यादेश लागू करावा आणि १९९४ च्या धर्तीवर स्वतंत्र आरक्षण अध्यादेश काढावा, अशी मागणी त्यांनी केली.
मराठवाड्यातील मराठा समाजाला हैदराबाद संस्थानाच्या गॅजेटनुसार आरक्षणाचा लाभ देण्याची मागणी करत त्यांनी सरकारवर टोलाही लगावला. “मराठा समाजाचे मन जिंकायचे असेल तर सरकारने आता निर्णयक्षम भूमिका घ्यावी,” असे ते म्हणाले.
सारथी शिष्यवृत्तीचा मुद्दाही ऐरणीवर
यावेळी जरांगे यांनी सारथी संस्थेतील विद्यार्थ्यांच्या रखडलेल्या शिष्यवृत्तींचा मुद्दाही जोरदारपणे मांडला. “महामंडळाचे तब्बल १६०० ते १८०० कोटी रुपये थकले आहेत. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. सरकारने तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा,” अशी मागणी त्यांनी केली.
मंत्र्यांवर गंभीर आरोप
भाषणादरम्यान जरांगे यांनी काही मंत्र्यांवर गंभीर आरोप करत राजकीय खळबळ उडवली. “माझ्या विरोधात बोलण्यासाठी काही मंत्र्यांनी एका संघटनेला दोन-दोन कोटी रुपये दिले,” असा दावा त्यांनी केला. मात्र, संबंधित मंत्र्यांची नावे त्यांनी जाहीर केली नाहीत.
नेकनूर येथील एका सरपंचावर ग्रामपंचायत जाळल्याचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीस यांनी वैयक्तिक लक्ष घालून संबंधित गुन्हा मागे घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क
दरम्यान, ३० मे रोजी अंतरवाली सराटी येथे होणाऱ्या प्रस्तावित आंदोलनासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर मराठा बांधव जमण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संभाव्य गर्दी आणि कायदा-सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर बैठकीदरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्रशासनानेही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकार आणि आंदोलनकर्त्यांमध्ये पुन्हा संघर्षाची चिन्हे दिसू लागल्याने आगामी काही दिवसांत राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


