रणजित मस्के, प्रतिनिधी
पालघर : बोईसर परिसरातील मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणत पालघर पोलिसांनी सराईत चोरट्याला अटक केली आहे. आरोपीकडून चोरीस गेलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
२४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८.५५ ते दुपारी ४ वाजण्याच्या दरम्यान बोईसर रेल्वे ब्रिजजवळील दांडीपाडा परिसरातून फिर्यादी मयंक राजेश यादव (वय २२) यांची हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटारसायकल (एमएच-४८ बीवाय-४१९१) चोरीस गेली होती. याप्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज तसेच गुप्त माहितीच्या आधारे प्रदीप सोमनाथ बॅनर्जी (वय ४८) याला ताब्यात घेतले. आरोपी हा सध्या बोईसर येथे वास्तव्यास असून मूळचा पश्चिम बंगाल राज्यातील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. चौकशीत त्याने चोरीची कबुली दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
तपासात आरोपीविरुद्ध मीरा-भाईंदर वसई-विरार तसेच मुंबई परिसरात चोरी आणि जबरी चोरीचे तब्बल १६ गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश शिंदे, पोलीस उपनिरीक्षक गोरखनाथ राठोड, पोलीस हवालदार कैलास पाटील, पोलीस हवालदार दिनेश गायकवाड, पोलीस हवालदार संजय धांगड, पोलीस अंमलदार वैभव जामदार आणि पोलीस अंमलदार महेश अवतार यांनी पार पाडली.


