कटिहार (बिहार) :
बाजारातून ताजी आणि हिरवीगार दिसणारी काकडी खरेदी करताना आता ग्राहकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचं समोर आलं आहे. सोशल मीडियावर सध्या एक धक्कादायक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून, बिहारमधील कटिहार रेल्वे स्टेशन परिसरात काकड्यांना कृत्रिम रंग लावून त्या ताज्या असल्याचा भास निर्माण केला जात असल्याचा प्रकार उघड झाला आहे. या व्हिडीओनंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, अन्नसुरक्षा विभागाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
सोशल मीडिया पर वायरल यह वीडियो कटिहार रेलवे स्टेशन का बताया जा रहा है, खीरा को हरे रंग से रंगती दिखी महिलाएं। pic.twitter.com/AdVmfTo00G
— छपरा जिला 🇮🇳 (@ChapraZila) May 8, 2026
व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला रेल्वे स्टेशन परिसरात खाली बसून सोललेल्या काकड्या गडद हिरव्या रंगाच्या द्रावणात बुडवत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. या प्रक्रियेनंतर काही क्षणांतच काकड्यांचा रंग बदलून त्या अधिक हिरव्या आणि चमकदार दिसू लागतात. तिच्या शेजारी बसलेली दुसरी महिला या प्रक्रियेत मदत करताना आणि काकड्या धुताना दिसते. नैसर्गिक आणि रंगवलेल्या काकड्यांमधील फरक व्हिडीओमध्ये सहज ओळखू येत असल्याने अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे.
‘मॅलाकाइट ग्रीन’सारख्या घातक रसायनांचा वापर?
अन्नसुरक्षा आणि आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, भाज्या आणि फळांना आकर्षक स्वरूप देण्यासाठी काही ठिकाणी ‘मॅलाकाइट ग्रीन’ (Malachite Green) किंवा तत्सम कृत्रिम रंगांचा वापर केला जातो. हे रसायन आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक मानलं जातं. यामुळे पोटाचे विकार, यकृतावर परिणाम, त्वचारोग आणि दीर्घकाळ सेवन केल्यास कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचाही धोका निर्माण होऊ शकतो.
तज्ज्ञ सांगतात की, अशा रसायनांचा वापर प्रामुख्याने ग्राहकांची फसवणूक करून माल ताजा असल्याचा भास निर्माण करण्यासाठी केला जातो. विशेषतः उन्हाळ्यात काकडी, कारली, ढोबळी मिरची यांसारख्या भाज्यांमध्ये हा प्रकार आढळून येतो.
प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न
कटिहार रेल्वे स्टेशनसारख्या सार्वजनिक ठिकाणी हा प्रकार उघडपणे सुरू असल्याने नागरिकांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “अशा प्रकारांवर तात्काळ कारवाई व्हायला हवी. लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे,” अशी मागणी सोशल मीडियावरून केली जात आहे.
काही नेटीझन्सनी “गरीबीच्या नावाखाली अशा प्रकारांचं समर्थन करणं चुकीचं आहे. हे थेट लोकांच्या आरोग्याशी खेळणं आहे,” अशा शब्दांत संताप व्यक्त केला. तर काहींनी रेल्वे प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणी यंत्रणांवर प्रश्न उपस्थित केले.
भेसळयुक्त काकडी कशी ओळखाल?
ग्राहकांनी बाजारातून भाजीपाला खरेदी करताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणं आवश्यक असल्याचं तज्ज्ञ सांगतात.
काकडीचा रंग अत्यंत गडद हिरवा आणि अनैसर्गिकरित्या चमकदार वाटत असल्यास सावध राहा.
काकडी ओल्या कापडाने किंवा कापसाने घासून पाहा. रंग निघत असल्यास ती कृत्रिम रंगाने रंगवलेली असू शकते.
काकडी किंवा इतर भाज्या खाण्यापूर्वी किमान ३० मिनिटे स्वच्छ पाण्यात भिजवून ठेवा.
भिजवलेल्या पाण्याचा रंग बदलत असल्यास रासायनिक रंगांचा वापर झाल्याची शक्यता असते.
शक्यतो नैसर्गिक रंग आणि आकार असलेला भाजीपाला खरेदी करण्यास प्राधान्य द्या.
ग्राहकांनी सतर्क राहण्याची गरज
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, केवळ आकर्षक दिसत असल्यामुळे कोणतीही भाजी किंवा फळ खरेदी करणं धोकादायक ठरू शकतं. ग्राहकांनी जागरूक राहून अशा प्रकारांची माहिती स्थानिक प्रशासन किंवा अन्नसुरक्षा विभागाला देणं आवश्यक आहे. दरम्यान, कटिहारमधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून, ‘स्लो पॉयझन’ म्हणून या प्रकाराची चर्चा रंगली आहे.


