उत्तर प्रदेश:
आंबेडकरनगर जिल्ह्यातील पाच जणांच्या निर्घृण हत्याकांडाने हादरलेल्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत मुख्य आरोपी आमिर याला रविवारी पहाटे झालेल्या एन्काउंटरमध्ये ठार केले. आईसह चार निष्पाप मुलांची हत्या करून फरार झालेल्या आमिरने पोलिसांवर गोळीबार केल्याने स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी प्रत्युत्तर दिले, ज्यात तो ठार झाला.
🚨BIG BREAKING
UP police have gunned down Aamir who killed his 4 children and wife in Ambedkar Nagar. pic.twitter.com/teNiiftHVS
— Amitabh Chaudhary (@MithilaWaaala) May 4, 2026
पहाटेचा थरारक एन्काउंटर
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आमिर नेवतरिया बायपासमार्गे पळून जाण्याच्या तयारीत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक पोलीस आणि स्पेशल ऑपरेशन ग्रुप (एसओजी) पथकाने सापळा रचला.
पहाटे सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून येणाऱ्या आमिरला थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्याने पोलिसांवर अचानक गोळीबार सुरू केला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने पोलिसांनी जवाबी कारवाई केली. या चकमकीत आमिरच्या छातीत गोळी लागली. जखमी अवस्थेत त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पोलीस थोडक्यात बचावले
या चकमकीदरम्यान पोलिसांवरही मोठे संकट ओढवले होते. एसओजी प्रभारी विनोद यादव यांच्या अंगावरील बुलेटप्रूफ जॅकेटवर गोळी आदळल्याने त्यांचा जीव थोडक्यात बचावला.
तसेच, या कारवाईत एक पोलीस उपनिरीक्षक आणि एक शिपाई जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
२ मेची भीषण घटना
या घटनेचा उगम २ मे रोजी अकबरपूर कोतवाली क्षेत्रातील मुरादाबाद मोहल्ल्यात झाला होता. एका घरात चार लहान मुलांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळले. या मुलांची विटांनी ठेचून अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती.
सुरुवातीला मुलांची आई गाझिया खातून हिचा शोध लागत नसल्याने तिच्यावर संशय घेतला जात होता. मात्र, दुसऱ्या दिवशी घरापासून सुमारे १०० मीटर अंतरावर तिचाही मृतदेह सापडला. तिच्या शरीरावरही गंभीर जखमा आढळून आल्याने आमिरनेच पाचही जणांची हत्या केल्याचे स्पष्ट झाले.
हत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट
या सामूहिक हत्येमागील नेमका हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही. वैयक्तिक वाद, कौटुंबिक कारणे किंवा अन्य कोणत्या कारणातून ही घटना घडली का, याचा तपास पोलीस करत आहेत.
परिसरात शोककळा; नागरिकांना दिलासा
आरोपी ठार झाल्याने परिसरातील तणाव काहीसा कमी झाला असला तरी, एका आईसह चार निष्पाप मुलांचा बळी गेल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी सर्व पुरावे गोळा करून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याचे सांगितले आहे.


