रणजित मस्के, प्रतिनिधी
पुणे जिल्हा हादरवून सोडणारी एक अतिशय संतापजनक आणि हृदयद्रावक घटना आळेफाटा परिसरात उघडकीस आली आहे. फिरायला नेण्याच्या बहाण्याने आपल्या काळजाच्या तुकड्यांना जंगलात नेऊन, पुण्यातील मोशी परिसरात राहणाऱ्या एका नराधम बापाने अवघ्या ३.५ वर्षांच्या चिमुकल्या मुलीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी आळेफाटा पोलिसांनी कौतुकास्पद कामगिरी करत अवघ्या १२ तासांत आरोपी बापाला बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सागर सदाशिव शिंदे (वय २९, रा. गायकवाड वस्ती, मोशी, पुणे) हा ४ मे रोजी आपल्या ५ वर्षांचा मुलगा आर्यन आणि ३.५ वर्षांची मुलगी हर्षदा यांना ‘फिरायला नेतो’ असे सांगून घरातून घेऊन गेला होता. मात्र, ६ मे रोजी तो घरी एकटाच परतला. मुलांबाबत विचारणा केली असता, ‘मुले मामाकडे आहेत’ अशी खोटी माहिती त्याने घरच्यांना देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.
या गुन्ह्याचा उलगडा झाला तो ५ वर्षांच्या आर्यनमुळे. ६ मे रोजी सकाळी पुणे-नाशिक महामार्गावर सातबावडी जवळील जंगलातून चिमुकला आर्यन रडत रडत बाहेर आला. तिथे असलेल्या नागरिकांना त्याने घडलेला थरार सांगितला. “वडिलांनी आम्हाला रात्री जंगलात सोडलं आणि बहीण हर्षदा तिथेच आहे,” असे त्याने रडत सांगितले. नागरिकांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी सूत्रे हलवून आर्यनच्या वडिलांचा शोध घेतला आणि त्याला संशयावरून ताब्यात घेतले.
पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी सागर शिंदे याने आपला गुन्हा कबूल केला. त्याने हर्षदाला सातबावडीच्या जंगलात नेऊन तिचा गळा दाबून खून केला आणि मृतदेह तिथेच झुडपात टाकून दिला होता. पोलिसांनी जंगलातून हर्षदाचा मृतदेह जप्त केला आहे. पोटच्या मुलीचा असा क्रूरपणे अंत करणाऱ्या बापाच्या कृत्याने संपूर्ण पुणे जिल्हा आणि जुन्नर तालुका सुन्न झाला असून परिसरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली आळेफाटा पोलिसांनी या प्रकरणाचा अत्यंत वेगाने तपास केला. तांत्रिक विश्लेषण आणि आर्यनने दिलेल्या माहितीच्या आधारे अवघ्या १२ तासांत आरोपीला जेरबंद करण्यात आले. आरोपी सागर शिंदे विरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत खुनाचा गुन्हा (गु.र.नं. १३३/२०२६) दाखल करण्यात आला आहे. मुलांच्या आजोबांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली असून, या हत्येमागचे नेमके कारण काय होते, याचा अधिक तपास पुणे पोलीस करत आहेत.


