भाईंदर प्रतिनिधी
दहिसर-भाईंदर लिंक रोड प्रकल्पाच्या कामादरम्यान शनिवारी दुपारी भीषण अपघात घडून दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. दुपारी सुमारे साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. रघुनाथ दास (वय ३८) आणि काना सिंग (वय ४५) अशी मृतांची नावे असून, या घटनेमुळे प्रकल्पस्थळी एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, दहिसर ते भाईंदर दरम्यान उभारण्यात येत असलेल्या महत्त्वाच्या लिंक रोड प्रकल्पाचे काम खासगी कंत्राटदार कंपनीमार्फत सुरू आहे. संबंधित कंपनीने उभारलेल्या प्रकल्पस्थळी क्रेनच्या साहाय्याने काम सुरू असताना अचानक क्रेन कोसळली. या दुर्घटनेत क्रेनखाली अडकून दोन्ही कामगार गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने बाहेर काढून उपचारासाठी नेण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
या घटनेत अन्य काही कामगार जखमी झाल्याचीही माहिती समोर येत असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुर्घटनेनंतर भाईंदर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.
या संदर्भात पुढील तपास सुरू असून, अपघाताचे नेमके कारण शोधले जात आहे. “घटनेचा सखोल तपास करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाईल,” अशी माहिती भाईंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी जितेंद्र कांबळे यांनी दिली.
दरम्यान, भाईंदर पश्चिम भागात सुरू असलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पादरम्यान घडलेली ही पहिली मोठी दुर्घटना असल्याने कामगारांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रकल्पस्थळी सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन केले जात आहे का, याबाबतही आता चौकशी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


