मुंबई प्रतिनिधी
सांताक्रूझ – चेंबूर जोडरस्ता (एससीएलआर) प्रकल्पाच्या विस्तारीकरणातील वाकोला-बांद्रा-कुर्ला संकुल (बीकेसी) उन्नत मार्गाचे काम अखेर निर्णायक टप्प्यात पोहोचले आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) या प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा पार करत वाकोला नाल्यावरील पुलावर ५४ मीटर लांबीचा दुहेरी कॉम्पोझिट गर्डर यशस्वीरित्या स्थापित केला आहे. या स्थापनेनंतर उन्नत मार्गाचे प्रमुख संरचनात्मक काम पूर्ण झाले असून उर्वरित किरकोळ कामे पूर्ण करून मे अखेरीस मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन आहे.
१.४ किमी लांबीच्या आणि चार पदरी असलेल्या या उन्नत मार्गामुळे वाकोला ते बीकेसी हा प्रवास लक्षणीयरीत्या सुलभ होणार आहे. सध्या या मार्गावर वाहतुकीच्या कोंडीमुळे २० ते २५ मिनिटांचा कालावधी लागतो; मात्र उन्नत मार्ग सुरू झाल्यानंतर हा प्रवास अवघ्या १० मिनिटांत पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या प्रकल्पांतर्गत वाकोला नाल्यावरील पुलाच्या पहिल्या आणि दुसऱ्या स्तरांना जोडणाऱ्या ३५८ मेट्रिक टन वजनाच्या गर्डरची उभारणी ही अभियांत्रिकी दृष्टीने आव्हानात्मक मानली जात होती. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ही प्रक्रिया सुरक्षितपणे पूर्ण करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. गर्डर बसविण्याच्या कामानंतर उन्नत मार्गाच्या मुख्य संरचनेचे काम पूर्णत्वास गेले आहे.
एससीएलआर प्रकल्पाच्या विस्तारीकरणांतर्गत एकूण तीन उन्नत मार्गांची उभारणी करण्यात येत आहे. यापैकी दोन मार्ग यापूर्वीच वाहतुकीसाठी खुले करण्यात आले असून तिसरा वाकोला–बीकेसी उन्नत मार्ग अद्याप प्रतीक्षेत होता. मूळ नियोजनानुसार हा मार्ग मार्चमध्ये सुरू होणार होता; मात्र कामाच्या विलंबामुळे ही मुदत पुढे ढकलण्यात आली. एप्रिलनंतरही प्रकल्प पूर्ण न झाल्याने टीका होत असताना आता मे अखेरीस मार्ग सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
हा उन्नत मार्ग सुरू झाल्यानंतर बीकेसी परिसरातून पश्चिम द्रुतगती महामार्गावर तसेच महामार्गावरून बीकेसीकडे जाणारी वाहतूक अधिक वेगवान होणार आहे. परिणामी, पूर्व-पश्चिम दळणवळण अधिक सक्षम होऊन वाहतूक कोंडीतही मोठी घट होण्याची अपेक्षा आहे. या मार्गाच्या सुरूवातीमुळे विस्तारित एससीएलआर प्रकल्पाच्या सुमारे १०.८८ किमी लांबीच्या मार्गिकांचे जाळे पूर्णत्वास जाणार आहे.
दरम्यान, उर्वरित कामांमध्ये रस्त्याचे डांबरीकरण, संरक्षक भिंती, सिग्नल प्रणाली, तसेच सुरक्षा उपाययोजनांची पूर्तता यांचा समावेश असून, ही कामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी एमएमआरडीएकडून यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत असल्याचे सांगण्यात येत आहे.


