कराड प्रतिनिधी
प्रेमसंबंधांना कुटुंबीयांचा विरोध असल्याने घरातून पळून आलेल्या दोन युवक आणि दोन युवतींच्या कथित ‘प्रेमविवाहा’ला कराड बसस्थानकातच अचानक ब्रेक लागल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. मंदिरात केवळ हारांची देवाणघेवाण करून विवाह झाल्याचा समज करून पुढील प्रवासाची तयारी सुरू असतानाच निर्भया पथकाच्या सतर्कतेमुळे हे संपूर्ण प्रकरण समोर आले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील हे चौघे दोन दिवसांपूर्वी घरातून निघाले होते. देवगडहून बाहेर पडत त्यांनी प्रथम कोल्हापूर येथे थांबा घेतला. त्यानंतर पुणे, पुढे म्हसवड मार्गे प्रवास करत ते कराडमध्ये दाखल झाले. दरम्यान, शहरातील विविध ठिकाणी मुक्काम केल्यानंतर बुधवारी सकाळी त्यांनी एका मंदिरात कोणताही वैधानिक विधी न करता केवळ एकमेकांना हार घालून विवाह केल्याचा समज करून घेतला.
या ‘विवाहा’नंतर पुढील ठिकाणी जाण्यासाठी चौघे कराड बसस्थानक परिसरात थांबले होते. याच वेळी नियमित गस्त घालत असलेल्या निर्भया पथकाच्या पोलिसांची नजर त्यांच्यावर गेली. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांना थांबवून चौकशी केली. सुरुवातीला चौघांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली; मात्र सखोल चौकशीत त्यांनी प्रेमविवाहासाठी घरातून पळून आल्याची कबुली दिली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील यांना माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली देवगड पोलिसांशी संपर्क साधण्यात आला. तपासादरम्यान संबंधित दोन मुली बेपत्ता असल्याच्या तक्रारी आधीच नोंद झाल्याचे स्पष्ट झाले.
यानंतर चौघांनाही पोलीस ठाण्यात आणून अधिक चौकशी करण्यात आली. त्यांनी घरातून कसा पलायन केला, कराडपर्यंतचा प्रवास कसा केला आणि विवाहाचा निर्णय कशा परिस्थितीत घेतला, याबाबत पोलिसांनी सविस्तर माहिती घेतली.
दरम्यान, देवगड येथील पोलीस आणि मुलींचे नातेवाईक कराडमध्ये दाखल झाले. आवश्यक चौकशीनंतर संध्याकाळी दोन्ही मुलींना त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात सुरक्षितपणे देण्यात आले. संबंधित युवक-युवतींचे जबाब नोंदवून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
या घटनेमुळे अल्पवयीन किंवा कुटुंबाच्या माहितीशिवाय घर सोडून जाणाऱ्या तरुणांबाबत पोलिसांची सतर्कता किती महत्त्वाची आहे, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे.


