मुंबई प्रतिनिधी
मुंबई : घाटकोपर परिसरात कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानावर जमावाने हल्ला केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या प्रकरणी घाटकोपर पोलिसांनी सुमारे ३० ते ४० जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार पोलीस कर्मचारी शनिवारी रात्री गस्त घालत असताना त्यांना एका व्यक्तीला मारण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक जमल्याची माहिती फोनवरून मिळाली. त्यानुसार पोलिसांचे पथक नित्यानंद नगर येथील हाजी मुल्ला चाळ परिसरात दाखल झाले. तेथे मोठी गर्दी जमलेली होती. एका व्यक्तीने दोन मुलींवर अतिप्रसंग केल्याचा आरोप असून तो घरात लपल्याची माहिती उपस्थितांनी पोलिसांना दिली.
पोलिसांनी जमावाला तेथून पांगण्याचे आवाहन केले आणि संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले. मात्र, त्याचवेळी संतप्त जमावातील काही जणांनी त्या व्यक्तीवर हल्ला चढवला. पोलिसांनी त्याचा बचाव करण्याचा प्रयत्न केला असता जमावाने पोलिसांवरही हल्ला केला.
या झटापटीत एका व्यक्तीने पोलीस हवालदार कोळी यांच्या डोक्यात हेल्मेट मारले, तर महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवान खंदारे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत संबंधित व्यक्तीला कसेबसे तेथून बाहेर काढून वाहनात बसवले. मात्र, त्यानंतरही जमावाने पोलीस आणि त्यांच्या वाहनावर दगडफेक व हल्ला केल्याचे सांगण्यात आले.
या घटनेत हवालदार कोळी यांच्या डोक्याला दुखापत झाली असून पुढील तपास घाटकोपर पोलीस करत आहेत.


