मुंबई प्रतिनिधी
मुंबई महानगरपालिकेच्या शाळांच्या खासगीकरणाच्या कथित प्रस्तावावरून शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील पालिकेने शाळा खासगी संस्थांकडे देण्याचा डाव आखल्याचा आरोप करत आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली आहे. “पालिका शाळा बिल्डरांच्या घशात घालण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.
The BMC is now proposing to privatise and hand over its schools to private players (most would be builders) under the bjp regime.
What a shame!
Over the past 2 decades, we managed to turn around BMC schools into schools that had upgraded infrastructure, curricular and extra…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) April 26, 2026
आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या प्रस्तावाचा निषेध नोंदवला. त्यांनी म्हटले की, गेल्या दोन दशकांत पालिका शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यात आल्या आहेत. इमारतींचे आधुनिकीकरण, डिजिटल शिक्षण, तसेच विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळांचे अभ्यासक्रम उपलब्ध करून देत शिक्षणाचा दर्जा उंचावण्यात आला आहे. अशा परिस्थितीत शाळांचे खासगीकरण करण्याचा विचार हा “शरमेचा” असल्याचे त्यांनी म्हटले.
पालिका शाळांमध्ये सध्या SSC सोबतच CBSE, IB, IGCSE आणि ICSE अशा विविध बोर्डांचे शिक्षण मोफत दिले जाते, हे विशेष अधोरेखित करत ठाकरे यांनी सांगितले की, ही सुविधा जगातील फार थोड्या महानगरपालिकांकडे आहे. याशिवाय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खगोलशास्त्र क्लब, निसर्ग क्लब, तसेच लिंग समानतेसारख्या विषयांवर उपक्रम राबवले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, ठाकरे यांनी पालिकेला पर्यायी उपायही सुचवले. “ज्या शाळांवर खासगी संस्थांनी बेकायदेशीर कब्जा केला आहे किंवा ज्या भूखंडांवर बिल्डरांनी अद्याप शाळा उभारल्या नाहीत, ते तातडीने परत मिळवावेत,” अशी मागणी त्यांनी केली. त्यामुळे सर्वसामान्य मुलांसाठी मोफत आणि दर्जेदार शिक्षण कायम ठेवता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
या मुद्द्यावरून आता सत्ताधारी भाजप आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू होण्याची चिन्हे आहेत. पालिका प्रशासनाकडून या प्रस्तावाबाबत अद्याप अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नसली, तरी शिक्षणासारख्या संवेदनशील विषयावरून निर्माण झालेला हा वाद आगामी काळात आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


