अमरावती प्रतिनिधी
तालुक्यातील भंडारज येथे राहणाऱ्या एका गर्भवती महिलेबाबत अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर वेळेवर आणि योग्य वैद्यकीय उपचार न मिळाल्याने, तसेच १०२ रुग्णवाहिका सेवेतील चालकाच्या कथित गैरवर्तनामुळे नवजात बाळाचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेमुळे आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा एकदा अधोरेखित झाल्या आहेत.
सोनिया रवि डोंगरे (वय २७) या सात महिन्यांच्या गर्भवती होत्या. अचानक प्रसूतीकळा सुरू झाल्याने त्यांच्या आईने आणि शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांना अंजनगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर प्रकृती गंभीर असल्याचे सांगत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला.
अचलपूर रुग्णालयात पोहोचल्यानंतर उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनीही महिलेची सखोल तपासणी न करता पुढील उपचारांसाठी अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात रेफर केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान, १०२ रुग्णवाहिकेद्वारे सोनिया यांना अमरावतीकडे हलविण्यात आले.
मात्र, या प्रवासादरम्यान रुग्णवाहिका चालकाने अत्यंत बेदरकारपणे वाहन चालविल्याचा आरोप आहे. प्रचंड वेगामुळे स्ट्रेचरवर असलेल्या सोनिया या दोन वेळा खाली पडल्याचे सांगण्यात आले. “हळू चालवा,” अशी विनंती केल्यानंतर चालकाने शिवीगाळ करत धमकी दिल्याचे कुटुंबीयांनी नमूद केले. वलगाव परिसरात गाडी गतिरोधकावर आदळल्यानंतर झालेल्या धक्क्याने सोनिया यांनी रुग्णवाहिकेतच बाळाला जन्म दिला.
घटनेचा अधिक धक्कादायक भाग म्हणजे प्रसूतीनंतरही चालकाने वाहन थांबवून मदत करण्याऐवजी महिलांकडूनच गाडी साफ करण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या आवारात पोहोचल्यानंतरही त्याच प्रकारे वर्तन केल्याचे सांगितले जाते. या सर्व प्रकारात नवजात बाळाचा मृत्यू झाला, तर सोनिया यांना बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले.
ही घटना शासनाच्या ‘माता-बाल मृत्यू शून्य’ अभियानावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी असल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे. गरीब रुग्णांसाठी असलेल्या आपत्कालीन सेवेत अशा प्रकारची बेपर्वाई अत्यंत गंभीर असल्याचे मत व्यक्त होत आहे.
दरम्यान, काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश महासचिव तेजस अभ्यंकर यांनी या प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. संबंधित रुग्णवाहिका चालक आणि अचलपूर येथील डॉक्टरांवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनोद पवार यांनी सांगितले की, “घटनेची तात्काळ चौकशी करण्यासाठी समिती गठित करण्यात येणार आहे. चौकशीत दोषी आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल.
दरम्यान, या घटनेमुळे आरोग्य यंत्रणेतील निष्काळजीपणा आणि आपत्कालीन सेवांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.


