छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी
घरगुती गॅस सिलिंडर मिळत नसल्याच्या नैराश्यातून एका ५० वर्षीय व्यक्तीने स्वतःचे डोके फोडून घेतल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दुपारी वाळूज औद्योगिक परिसरात घडली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून, गॅसपुरवठ्याच्या प्रश्नावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
वाळूज एमआयडीसीतील रांजणगाव शेनपुंजी परिसरातील कमल गॅस एजन्सीसमोर ही घटना घडली. बालचंद नेमाने (वय ५०) असे जखमी व्यक्तीचे नाव असून, ते गेल्या काही दिवसांपासून घरगुती गॅस सिलिंडरसाठी एजन्सीच्या वारंवार चकरा मारत होते. मात्र, प्रत्येक वेळी “सिलिंडर उपलब्ध नाही” असे सांगण्यात आल्याने ते संतप्त झाले.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, एजन्सीसमोरच त्यांनी संतापाच्या भरात “घरी बायकोला काय सांगू?” अशी हतबल प्रतिक्रिया व्यक्त केली आणि अचानक स्वतःचे डोके आपटून घेतले. या प्रकारामुळे ते रक्तबंबाळ अवस्थेत कोसळले. उपस्थित नागरिकांनी तात्काळ धाव घेत त्यांना रुग्णालयात हलवले.
घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी नेमाने यांना तातडीने शासकीय घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील अनेक भागांत अद्याप घरगुती गॅस पुरवठा सुरळीत नसल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. नागरिकांना सिलिंडरसाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागत असून, काही ठिकाणी एजन्सीसमोर रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे.
याउलट, केंद्र सरकारने गॅसटंचाईचे वृत्त फेटाळून लावले आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने अलीकडेच जारी केलेल्या निवेदनात देशभरात एलपीजी सिलिंडरचा पुरवठा सुरळीत असल्याचा दावा केला आहे. कोणत्याही वितरकाकडून तुटवड्याचा अहवाल प्राप्त झालेला नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, घरपोच वितरण सेवा पुन्हा सुरू करण्यात आल्याचे आणि ओटीपी-आधारित बुकिंग प्रणालीद्वारे ९९ टक्के व्यवहार होत असल्याचे मंत्रालयाने नमूद केले.
तथापि, प्रत्यक्षात नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी आणि अधिकृत दाव्यांतील तफावत या घटनेमुळे अधोरेखित झाली आहे. गॅसपुरवठ्याच्या प्रश्नावर प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.


