अहिल्यानगर प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेतील कलगीतुरा या वैशिष्ट्यपूर्ण शाहिरी प्रकाराला आयुष्यभर वाहून घेतलेले ज्येष्ठ शाहीर रामदास नाथाजी गुंड यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने राज्यातील शाहिरी क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून, ‘डफ पोरका झाला’ अशा शब्दांत रसिकांकडून हळहळ व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र राज्य शाहिरी संघटनेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या गुंड यांनी कलगीतुऱ्याच्या माध्यमातून राज्यभर असंख्य कार्यक्रम सादर केले. पारंपरिक लोककलेला आधुनिक संदर्भ देत त्यांनी तिला नवसंजीवनी दिली. जांभूळ आख्यान, शिव-पार्वती कथा यांसारख्या विषयांचे प्रभावी सादरीकरण ही त्यांची खासियत होती. त्यांच्या दमदार आवाजात आणि जिवंत सादरीकरणात पुराणकथांचा आशय जणू साक्षात उभा राहत असे.
गावागावांतून घडवली पिढी
पारनेर तालुक्यातील काताळवेढे हे त्यांचे मूळ गाव. पुणे जिल्ह्यासह राज्यातील विविध भागांत त्यांचा मोठा संपर्क होता. गावोगावी फिरून सामाजिक प्रश्नांवर भाष्य करत त्यांनी शाहिरीला जनतेच्या मनात रुजवले. त्यांच्या कार्यातून अनेक नवोदित कलाकार घडले. कलगीतुरा परंपरेला त्यांनी दिलेले योगदान पुढील पिढ्यांसाठी दिशादर्शक ठरणारे आहे.
वर्तमानावर बोट ठेवणारी शाहिरी
गुंड यांची शाहिरी केवळ पौराणिक कथांपुरती मर्यादित नव्हती. महागाई, कांदा व दूध दरवाढ, आरक्षण, बैलगाडा बंदी, बालविवाह, स्त्रीभ्रूण हत्या, शिक्षणाची गरज, बदलते राजकारण, जागतिक घडामोडी, कोरोना महामारी, व्यसनमुक्ती, बिबट्यांचे हल्ले अशा विविध समकालीन विषयांवर त्यांनी प्रभावीपणे आवाज उठवला. त्यांच्या शाहिरीत सामाजिक जाणीव आणि प्रबोधन यांचा संगम दिसून येत असे.
व्यक्तिमत्त्वाची वेगळी छाप
भगवी वस्त्रे, जरीकामाची अलंकारिक सजावट, मानेवर रुळणारे केस आणि हातात डफ, ही त्यांची ओळख होती. डफावरची पहिली थाप पडताच श्रोते मंत्रमुग्ध होत. तासन्तास चालणाऱ्या कलगी-तुरा फडात स्त्री-पुरुष श्रेष्ठत्वावर रंगणारे सवाल-जवाब आणि वेद-शास्त्र-पुराणांचा संदर्भ देणारे त्यांचे विवेचन रसिकांना खिळवून ठेवत असे.
परंपरेचा एक स्तंभ हरपला
कलगीतुरा हा दुर्मिळ आणि अभ्यासपूर्ण लोककलाप्रकार जिवंत ठेवण्यात गुंड यांचे मोलाचे योगदान होते. त्यांच्या जाण्याने शाहिरी परंपरेतील एक भक्कम स्तंभ कोसळला आहे. त्यांच्या डफाची थाप आता थांबली असली, तरी त्यांनी घडवलेली कला आणि विचारांची परंपरा दीर्घकाळ जिवंत राहील, अशीच भावना त्यांच्या चाहत्यांकडून व्यक्त होत आहे.


