मुंबई प्रतिनिधी
मुंबई महापालिकेच्या मालकीच्या मोक्याच्या भूखंडांच्या विक्रीवरून पुन्हा एकदा राजकीय वाद निर्माण झाला आहे. वरळी परिसरातील अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी असलेला सुमारे ५१६६ चौरस मीटरचा भूखंड अवघ्या ४५५ कोटी रुपयांत खासगी बिल्डरला देण्याचा घाट घातल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या व्यवहारामुळे महापालिकेचे मोठे आर्थिक नुकसान होणार असून विशिष्ट बिल्डरला फायदा करून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा व खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित भूखंडाच्या लिलाव प्रक्रियेला तात्काळ स्थगिती देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
मुंबई शहरात विविध विभागांमध्ये मुंबई महापालिकेच्या मालकीचे अनेक मोक्याचे भूखंड उपलब्ध आहेत. शहराच्या वाढत्या गरजा लक्षात घेता या भूखंडांचा वापर नियोजनबद्ध पद्धतीने करण्याची गरज आहे. मात्र सत्ताधारी पक्षाकडून अशा भूखंडांच्या विक्रीत पारदर्शकता न ठेवता निवडक बिल्डरांना लाभ मिळेल अशा अटी घालून लिलाव प्रक्रिया राबवली जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
वरळी परिसरातील प्रस्तावित भूखंडाच्या व्यवहाराकडे लक्ष वेधताना गायकवाड म्हणाल्या की, “सुमारे ५१६६ चौरस मीटर इतक्या मोठ्या आणि मोक्याच्या भूखंडाच्या बदल्यात महापालिकेला केवळ ४५५ कोटी रुपये आणि चाचणी प्रयोगशाळेसाठी अवघी १३०० चौरस मीटर जागा देण्याची अट ठेवण्यात आली आहे. या अटी पाहता हा व्यवहार महापालिकेच्या हिताचा नसून विशिष्ट बिल्डरला प्रचंड आर्थिक लाभ देणारा आहे.”
त्यांच्या मते, संबंधित बिल्डर या भूखंडावर पंचतारांकित हॉटेल किंवा उच्चभ्रू व्यावसायिक प्रकल्प उभारून मोठा नफा कमावू शकतो. मात्र महापालिकेला मिळणारा फायदा अत्यल्प असल्याने हा व्यवहार शहराच्या हिताला बाधा आणणारा आहे.
महापालिकेच्या मालमत्तांचा वापर करताना पारदर्शक प्रक्रिया आणि सर्व पक्षांच्या गटनेत्यांशी चर्चा होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. “महापालिकेच्या मालकीची जमीन ही मुंबईकरांची संपत्ती आहे. ती कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी वापरली जाऊ नये. अशा महत्त्वाच्या व्यवहारांपूर्वी महापालिका गटनेत्यांची बैठक घेऊन त्यावर सविस्तर चर्चा होणे गरजेचे आहे,” असे त्या म्हणाल्या.
गायकवाड यांनी आणखी एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला. “महापालिका आर्थिकदृष्ट्या सक्षम असताना असे भूखंड खासगी बिल्डरांना देण्याऐवजी स्वतःच का विकसित करत नाही? जर महापालिकेने स्वतः प्रकल्प उभारले तर त्यातून मिळणारा नफा थेट शहराच्या विकासासाठी वापरता येईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसच्या मते, गेल्या काही वर्षांत मुंबईतील अनेक मोक्याचे भूखंड नियमबाह्य पद्धतीने खासगी विकसकांना देण्यात आल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे अशा व्यवहारांची स्वतंत्र चौकशी करून त्यात पारदर्शकता आणण्याची गरज असल्याचे पक्षाने म्हटले आहे.
दरम्यान, वरळीतील प्रस्तावित भूखंडाच्या व्यवहारात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा असल्याचा आरोप करत काँग्रेसने या लिलाव प्रक्रियेला तातडीने स्थगिती देण्याची मागणी केली आहे. “मुंबईकरांची मालमत्ता विकण्याचा प्रकार थांबवला पाहिजे. अन्यथा भविष्यात शहराचे मोठे नुकसान होऊ शकते,” असा इशाराही गायकवाड यांनी दिला.
या प्रकरणामुळे मुंबई महापालिकेतील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे असून, पुढील काही दिवसांत या व्यवहारावर राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


