प्रतिनिधी | रणजित मस्के
जळगाव जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांनी सर्वसामान्यांची झोप उडवली असताना, स्थानिक गुन्हे शाखा आणि भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी संयुक्तरीत्या धडाकेबाज कारवाई करून चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या मोहिमेत पोलिसांनी ३ महागड्या दुचाकी हस्तगत केल्या असून दोन संशयित आरोपींची ओळख पटवण्यात यश मिळवले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार राबवण्यात येत असलेल्या मोहिमेला मिळालेले हे मोठे यश मानले जात आहे.
दिनांक ६ एप्रिल २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे अंमलदार शहरात गस्त घालत असताना, त्यांना गुप्त बातमीदाराकडून महत्त्वाची माहिती मिळाली. भुसावळमधील इराणी मोहल्ला भागातील रजा टॉवर परिसरात काही संशयित दुचाकी उभ्या असल्याचे समजताच पोलिसांनी तातडीने तिथे धाड टाकली. घटनास्थळी उभ्या असलेल्या गाड्यांची तपासणी केली असता, त्या ठिकाणी कोणीही मालक समोर आला नाही. अखेर पोलिसांनी या गाड्या पोलीस स्टेशनला आणून त्यांचे इंजिन आणि चेसिस नंबर तपासले. या तपासात धक्कादायक बाब समोर आली की, या दुचाकी मुक्ताईनगर, चोपडा आणि अहिल्यानगर (तोफखाना) येथील पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरल्या गेल्या होत्या.
या चोरीप्रकरणी प्राथमिक चौकशीत हसन अली ऊर्फ आशु नियाज अली इराणी आणि सलमान अली हुजूर अली इराणी (दोघे रा. इराणी मोहल्ला, भुसावळ) या दोघांची नावे निष्पन्न झाली आहेत. पोलिसांनी एकूण २ लाख १० हजार रुपये किमतीच्या पल्सर १२५, बजाज पल्सर N-160 आणि KTM Duke 250 या तीन गाड्या जप्त केल्या आहेत.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत राहुल गायकवाड, शरद बागले, रवी नरवाडे, गोपाळ गव्हाळे, विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे, राहुल वाघ, योगेश माळी, प्रशांत सोनार आणि भूषण चौधरी या पोलीस अधिकारी व अंमलदारांचा सहभाग होता. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनमार्फत पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.


