पुणे प्रतिनिधी
सातारा शहरातील ज्येष्ठ महिलेची फसवणूक करून तिच्याकडील रोकड लंपास करणाऱ्या सराईत चोरट्याला पुण्यातील शिवाजीनगर पोलिसांनी अखेर जेरबंद केले आहे. मुंबई-पुणे मार्गावरील पाटील इस्टेट परिसरातील इराणी वस्तीत राहणाऱ्या संशयिताला त्याच्या घरातून ताब्यात घेण्यात आले. या कारवाईमुळे ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करणाऱ्या फसवणूक करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी प्रभावी लगाम लावला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव इब्राहीम बाबू इराणी (रा. इराणी वस्ती, पाटील इस्टेट, शिवाजीनगर, पुणे) असे आहे. सातारा शहरातील शाहूपुरी परिसरात घडलेल्या या घटनेने काही दिवसांपूर्वी खळबळ उडाली होती. शाहूपुरीतील एका बँकेतून रोकड काढून बाहेर पडलेल्या ज्येष्ठ महिलेला आरोपीने चलाखीने गाठले. विविध बतावणी करून तिचे लक्ष दुसरीकडे वळवत तिच्याकडील सात हजार रुपयांची रोकड त्याने लंपास केली आणि घटनास्थळावरून पसार झाला.
या घटनेनंतर पीडित महिलेने शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरणाची तपासणी करण्यात आली असता संशयित व्यक्तीचा चेहरा स्पष्टपणे कॅमेऱ्यात कैद झाल्याचे आढळले. त्यावरून पोलिसांनी आरोपीचा माग काढण्यास सुरुवात केली.
दरम्यान तपास पथकातील पोलीस कर्मचारी महेंद्र कडू यांना गुप्त माहिती मिळाली की, संबंधित चोरटा पुण्यातील शिवाजीनगर भागातील इराणी वस्तीत वास्तव्यास आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने सापळा रचत पाटील इस्टेट परिसरातील त्याच्या राहत्या घरावर धाड टाकली आणि आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत इब्राहीम इराणी याने सातारा शहरातील ज्येष्ठ महिलेची फसवणूक करून रोकड चोरल्याची कबुली दिली.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात इब्राहीम इराणी हा सराईत गुन्हेगार असल्याचे उघड झाले आहे. पुणे शहर, पुणे जिल्हा तसेच रायगड जिल्ह्यातही त्याने ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करून बतावणीच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार केल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात त्याच्याविरुद्ध यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले आणि सहायक पोलीस आयुक्त चंद्रकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक अमर काळंगे, सहायक निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक प्रमोद पाटील, तसेच हवालदार संतोष मेमाणे, सचिन जाधव, महेंद्र कडू, रोहित झांबरे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
पोलिसांनी नागरिकांना, विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना, अनोळखी व्यक्तींच्या बोलण्याला बळी न पडण्याचे आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास तत्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे.


