प्रतिनिधी|स्वप्नील गाडे
मुंबई : चर्चगेट परिसरातील टाटा गार्डनमध्ये घडलेल्या खुनाच्या प्रकरणाचा आझाद मैदान पोलीस ठाण्याने अवघ्या २४ तासांत छडा लावत आरोपीला अटक केली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. घटनास्थळी फॉरेन्सिक आणि फिंगरप्रिंट तज्ञांच्या मदतीने पुरावे गोळा करण्यात आले. तसेच सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास वेगाने पुढे नेण्यात आला.
दरम्यान, ४ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास टाटा गार्डन परिसरात राहुल पंजवानी उर्फ पंजाबी (वय अंदाजे ५० ते ५५) यांचा डोक्यात दगडाने वार करून खून करण्यात आला होता.
तपासादरम्यान आनंद पांडूरंग जाधव (वय ५२) याचा या खुनात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी कारवाई करत आरोपीला २४ तासांच्या आत अटक केली. सध्या त्याला न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी मिळवण्यात आली आहे.
या कारवाईत पोलीस निरीक्षक नारायण पडवळ, सह पोलीस निरीक्षक शाह, पोलीस निरीक्षक पाटील, सह पोलीस निरीक्षक कलुबर्मे, पोलीस उपनिरीक्षक ठेमस्कर, पोलीस हवालदार कटरे, पोलीस हवालदार पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असून ही कारवाई पोलीस सहआयुक्त सत्य नारायण चौधरी आणि अपर पोलीस आयुक्त अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.


