सातारा प्रतिनिधी
निसर्गसंपन्न आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या सातारा जिल्ह्याला राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असून, कोयना-दौलत डोंगरी महोत्सवासारखे उपक्रम ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

कोयना-दौलत डोंगरी महोत्सवाच्या सांगता समारंभात ते बोलत होते. यावेळी कोयना नदीवरील सांगवड येथील मोठ्या पुलाचे, दौलतनगर येथील शिवदौलत स्टेडियम, लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकातील संगीत कारंजे व लेझर शो तसेच स्व. शिवाजीराव देसाई स्मृतिभवनाचे उद्घाटन करण्यात आले. पापर्डे येथे जल पर्यटन केंद्राचाही दूरदृश्यप्रणालीद्वारे शुभारंभ करण्यात आला.
यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, प्रभारी पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, पर्यटन विभागाचे संचालक बी. एन. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
महत्त्वाचे मुद्दे
• सातारा जिल्ह्याला ‘पर्यटन हब’ बनवण्यासाठी शासनाकडून विविध पायाभूत प्रकल्प राबवले जात आहेत.
• नवीन महाबळेश्वर प्रकल्प विकसित करून पर्यटकांचा ताण कमी करण्याबरोबरच स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार.
• डिसेंबर-जानेवारीमध्ये कोयना बॅकवॉटर फेस्टिव्हल जागतिक दर्जाचा करण्यासाठी शासन प्रयत्नशील.
• डोंगरी भागातील नागरिकांना सांस्कृतिक मेजवानी देण्यासाठी भजन-कीर्तन, लावणी, पोवाडा, खाद्य जत्रा यांसह विविध कार्यक्रम.
• पॅराग्लायडिंग, सी-प्लेन राईड, स्कुबा डायव्हिंगसारख्या साहसी पर्यटनाला प्रोत्साहन.
• वासोटा आणि इतर पर्यटनस्थळांसाठी रोपवे मंजूर; तापोळा व आपटी येथे कोयना नदीवर मोठे पूल उभारले जाणार.
• या पुलांमुळे दुर्गम भागातील सुमारे १०५ गावे जोडली जाणार असून पश्चिम महाराष्ट्र-कोकण संपर्क अधिक सुलभ होणार.
शेतकरी-युवकांसाठी योजना
शेतकऱ्यांसाठी क्लस्टर शेती उपक्रम राबवून आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ देण्याचा प्रयत्न सुरू आहे. बांबूला ‘गवत’ वर्गात समाविष्ट केल्याने मनरेगातून अनुदान मिळणार असून सातारा जिल्ह्यात सुमारे ८ हजार एकरवर बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांनी संमती दिली आहे.
तसेच ‘नमो शेतकरी सन्मान योजना’ अंतर्गत केंद्र व राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना दरवर्षी १२ हजार रुपयांची मदत दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले. ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
“मी सातारचा शेतकरी पुत्र”
“मी उपमुख्यमंत्री असलो तरी शेवटी सातारचा एक सामान्य शेतकरी पुत्र आणि कार्यकर्ता आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही,” असे सांगत शिंदे यांनी सातारकर असल्याचा अभिमान व्यक्त केला.
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी डोंगरी महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे सांगत पुढील वर्षी या महोत्सवाचा कालावधी वाढवण्याची मागणी होत असल्याचे नमूद केले.
कार्यक्रमास परिसरातील नागरिक, अधिकारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रदर्शन यशराज देसाई यांनी केले.


