रणजीत मस्के | प्रतिनिधी
सोलापूर : शहरात अवैध शस्त्रांच्या वाढत्या वापरावर आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान गुन्हे शाखेने तत्परता दाखवत तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या इसमाला ताब्यात घेतले. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला
पोलीस आयुक्तांनी शहरातील वाढत्या अवैध शस्त्रांच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी गुन्हे शाखेला विशेष सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ४ एप्रिल २०२६ रोजी गुन्हे शाखेचे स.पो.नि. शंकर धायगुडे यांच्या पथकाला खात्रीशीर माहिती मिळाली की, संत तुकाराम चौकाजवळील एसटी स्टँड क्रमांक २ समोर गुरुनानक चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक इसम हातात लोखंडी तलवार घेऊन मोठ्याने आरडाओरड करत दहशत निर्माण करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तेथे संबंधित इसम हातात तलवार घेऊन नागरिकांना घाबरवत असल्याचे निदर्शनास आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी शिताफीने कारवाई करत कोणतीही अनुचित घटना घडण्यापूर्वीच त्या इसमाला ताब्यात घेतले.
ताब्यात घेतल्यानंतर चौकशी केली असता त्याने आपले नाव मोहन नागनाथ पोतु (वय ३७, रा. शास्त्रीनगर, शिवलिंग मंदिराजवळ, सोलापूर) असे सांगितले. पंचासमक्ष झडती घेतली असता त्याच्या ताब्यातील सुमारे २ फूट लांबीची लोखंडी तलवार जप्त करण्यात आली. संबंधित इसमाने कोणताही परवाना नसताना शस्त्र बाळगल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ४, २५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. तसेच आरोपीस पुढील कारवाईसाठी सदर बझार पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उपआयुक्त (गुन्हे/वि.शा.) डॉ. अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे तसेच पोलीस हवालदार अंकुश भोसले, पोलीस हवालदार शैलेश बुगड, पोलीस शिपाई राजू वाघमारे आणि पोलीस शिपाई अभिजीत धायगुडे यांनी पार पाडली.


