स्वप्नील गाडे | प्रतिनिधी
मुंबई : परिमंडळ ८ अंतर्गत विविध पोलीस ठाण्यांनी मालमत्तेच्या गुन्ह्यांमध्ये हस्तगत केलेला एकूण ८४ लाख ४३ हजार ४७९ रुपयांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत देण्यात आला. या सामूहिक उपक्रमात एकूण २८७ वस्तूंचा समावेश होता.
बीकेसी, खेरवाडी, निर्मलनगर, वाकोला, विलेपार्ले, सहार आणि विमानतळ या सात पोलीस ठाण्यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. चोरी, जबरी चोरी, मोटार वाहन चोरी तसेच सोनसाखळी चोरीसारख्या गुन्ह्यांमधील दागिने, दुचाकी-चारचाकी वाहने, रोख रक्कम यांचा समावेश असलेला मुद्देमाल आरोपींकडून जप्त करण्यात आला होता.

तसेच गहाळ झालेल्या मोबाईल फोनचा शोध घेण्यासाठी ‘CEIR’ प्रणालीचा वापर करून तांत्रिक तपास करण्यात आला. त्यामधून एकूण २७७ मोबाईल हस्तगत करण्यात आले.
हा परतावा कार्यक्रम बीकेसी येथील पासयदान हॉलमध्ये पार पडला. पोलीस उपायुक्त मनीष कलवानिया यांच्या हस्ते हा मुद्देमाल संबंधित मालकांना सुपूर्द करण्यात आला. यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
गुन्ह्यांमधील हरवलेली मालमत्ता पुन्हा मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत पोलिसांचे आभार मानले.


