मुंबई प्रतिनिधी
मुंबई : चेंबूर परिसरातील सुभाषनगर येथे घडलेल्या एका दुर्दैवी अपघातात सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. नथुराम साखविलकर (वय ५२, रा. घाटला, चेंबूर) असे मृत व्यक्तीचे नाव असून, कामाच्या पहिल्याच दिवशी त्यांच्यावर काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुभाषनगर येथील इमारत क्रमांक १० मध्ये वैभव लक्ष्मी डेव्हलपर्समार्फत पुनर्विकासाचे काम सुरू आहे. संबंधित इमारतीत साखविलकर यांची सुरक्षारक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. रविवारी सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास ते इमारतीतील एलिव्हेटर पार्किंग सिस्टीमची पाहणी करत असताना पाचव्या मजल्यावरील पार्किंग प्लॅटफॉर्मवरून त्यांचा तोल गेला. यामुळे ते थेट तळमजल्यावरील मोकळ्या जागेत कोसळले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस व अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या मदतीने साखविलकर यांना बाहेर काढून तात्काळ राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.
या घटनेप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत असून, सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


